राष्ट्र सेवादल शिबीरात मानवतेचा विचार जागवू या- प्रा.संजय मंगला गोपाल

रत्नागिरी :- जन्माला येतांना आपण ठरवू शकत नाही की कोणत्या जातीत, धर्मात, पंथात जन्माला यावे. माणूस म्हणूनच आपला जन्म या भूतलावर होतो त्यामुळे माणूस म्हणूनच जात, धर्म ,पंथ ,वर्ण ,वंश याच्या पलिकडे मानवतेचा संदेश घेत खरा तो एकची धर्म या सानेगुरुजीच्या प्रगल्भ विचाराने पिढी घडवावी हाच या शिबीरांचा मुख्य उद्देश असल्याचे जेष्ट विचारवंत प्रा. संजय मंगला गोपाल यांनी राष्ट्र सेवादल शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले, यावेळी त्यांनी झींदाबाद या घोषणेचा अर्थ उलगडून सांगितला.
उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्याना शारिरीक आणि बौध्दीक गुंतवणूक देणे आवश्यक आहे , त्यांना स्क्रीन पासून दूर ठेवत मैदान आणि निसर्गात उतरवितांना त्यांना वैचारिक साधना देणे गरजेचे आहे या विचारातून २७ ते २९ असे तीन दिवसीय राष्ट्रसेवादल शिबीराचे आयोजन केले होते या शिबीराला रत्नागिरी आणि देवरुख परिसरातून अभूतपुर्व प्रतिसाद लाभला.
शिबीर प्रमुख सीमा हेगशेट्ये, राष्ट्रसेवादल जिल्हा अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम, जिल्हा संघटक युयुत्सू आर्ते, शिबीर संयोजक सुकुमार शिंदे यांचे यात मोठे योगदान होते.
या शिबीरात बाबा नदाफ आणि त्यांचे सहकारी चंदन माटूंगे, अमित कळके यांनी पुर्ण तिन दिवस मुलांना विविध कला, गाणी ॲरोबीक, लेझीम, झांझ आणि नृत्य ( तामीळ ) शिकविले आणि त्यात तरबेज केले याची प्रचिती समारोपाच्या नृत्याविष्कारातुन अनुभवता आली.
पहाटे ५ पासून सुरु होणारा मुलांचा दिनक्रम रात्री १० वाजता प्रार्थनेने समारोप होत होता.
आजच्या समाज माध्यमांच्या आणि द्वेषपूर्ण वातावरणात मुलांना शारीरिक, बौध्दिक, भावनिक विकासा सोबत साने गुरूजींचा मानवतेचा विचार देण्याची गरज आहे, ती गरज अशा शिबीरातून पूर्ण केली जात होती.
आवश्यक जीवनमूल्ये शिकण्याची ही संधी आहे, एखादी घटना, एखादा प्रसंग किंवा एखादी व्यक्ती आपले आयुष्य कसे बदलवून टाकते हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील काही गोष्टी नवनिर्माण संस्था अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी शिबीराच्या उदघाटनपर भाषणात कथन केल्या.
उद्घाटनाची सुरूवात शिबीरातील मुलांच्या हस्ते साने गुरूजींच्या प्रतिमेला हार घालून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
राष्ट्र सेवा दलाचे हे अशा प्रकाराचे पहिलेच शिबीर रत्नागिरीत आयोजित करण्यात आले होते. शिबीरात विविध बौध्दिक सत्रासोबत, खेळ-गाणी घेऊन मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना दिली गेली असे राष्ट्र सेवा दलाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी सांगितले.
समाजात वाढलेली धार्मिक आणि जातीयवादी तेढ पाहता, साने गुरूजी आणि एस एम जोशी यांच्या समाजवादी विचारांची मुलांना ओळख होणं आवश्यक आहे, त्यासाठी अशा शिबीरांचा फायदा होईल. देवरूखच्या मातृसंस्थेची शिबीरांची परंपरा पुन्हा सुरू झाली याचा विशेष आनंद आहे असे सांगत राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक युयुत्सू आर्ते यांनी मनोगत व्यक्त केले.
पालकांनी मुलांच्या स्वावलंबनाचा विचार करून अशा निवासी शिबीरांना मुलांना पाठवलं पाहिजे. मुलांचा खरा विकास घडवून आणायचा असेल तर मुलांना खेळू-पडू-भांडू दिले पाहिजे. उच्च जीवनमुल्यांचा आग्रह आपण धरला पाहिजे, असे प्रतिपादन अंनिसचे सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वल्लभ वणजू यांनी केले.
शिबीराच्या काळात जेष्ट लेखक चंद्रकांत झटाले ( अकोला) यांचे ”मजबूरीका नाम महात्मा गांधी नाही तर मजबूती का नाम महात्मा गांधी हे अत्यंत अभ्यासपुर्ण व्याख्यान झाले, तसेच बाबा नदाफ यांची सेवादल विचारांची गरज आणि इतिहास यावर अप्रतिम मार्गदर्शन झाले. प्रा. प्रिया गांधी यांचे (ॲाटीझम) मोबाईल मध्ये गुंतलेली मुले आणि समस्या या विषयावर उदबोधक व्याख्यान झाले. श्रृती सुर्वे- राणे यांचे करिअर आणि समाजभान या विषयावर प्रेझेंटेशनसह मार्गदर्शन सेशन झाले.
शिबीराच्या सांगता सोहळ्यात शिबीर प्रमुख सीमा हेगशेट्ये यांनी तीन दिवसांचा शिबीर वृत्तांत कथन केला यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिबीरार्थीची मनोगते झाली. आणखी दोन दिवस तरी शिबीर पाहिजे अशी अपेशा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. साने गुरुजींची धडपडणारी मुले घडविणारे राष्ट्रसेवादल शिबीर दरवर्षी नवनिर्माण शिक्षण संस्था नियमितपणे घेईल असे संस्था अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि संस्था कार्यवाह परेश पाडगावकर यांनी समा रोपाच्या सोहळ्यात सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. अश्विनी कांबळे यांनी मानले, यावेळी एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण हाय चे प्राचार्य अरविंद पाटील, शिबिराचे संयोजक सुकुमार शिंदे, प्रशिक्षक बाबासाहेब नदाफ, चंदन माटुंगे, अमित कळके , डॅा. महेंद्र मोहन, बबन मयेकर , आत्माराम मेस्त्री , प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



