
रत्नागिरी : जगातल्या सर्वोच्च युद्धभूमी असलेल्या ‘सियाचीन’ मध्ये सैनिकांसाठी पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रिफिलिंग सेंटर आणि दुसरे ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रिफिलिंग सेंटर जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा येथे उभारून सैन्यदलाला ‘सिर्फ’ या संस्थेच्या माध्यमातून समर्पित करणाऱ्या सुमेधाताई चिथडे यांचे व्याख्यान रत्नागिरी शहरातील उर्मी ग्रुपने आयोजित केले आहे. दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रंजन मंदिर सभागृह, शिर्के हायस्कूल, माळनाका, रत्नागिरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
“राष्ट्राय स्वाहा इदम् न मम” या कार्यक्रमाच्या सुमेधाताई चिथडे व्याख्यात्या आहेत. गेली २४ वर्ष सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, पुणे (SIRF) या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुमेधाताई राष्ट्रसेवा कार्य म्हणून सैन्य दलाच्या सेवेत कार्यरत आहेत. सुमेधाताईंनी या कामाची सुरुवात त्यांचे पती योगेश चिथडे यांच्या सोबतीने आणि प्रेरणेने केली.
रत्नागिरी शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या उर्मी ग्रुपने या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. उर्मी ग्रुप हा महिलांनी भिशी साठी एकत्र जमत असताना, फक्त गप्पा मारण्यासाठी एकत्र न येता काहीतरी वेगळं कराव या उद्देशाने नवनवीन उपक्रम घेऊन उर्मी ग्रुप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.
हे व्याख्यान मोफत असून सर्व देशप्रेमी नागरिकांनी यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन उर्मी ग्रुपच्या संचालिका आदिती पटवर्धन यांनी केले आहे.



