मुख्य बातमी

श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी १५ डिसेंबर रोजी मोफत मार्गदर्शन शिबीर 

सर्व वयोगटांतील व्यक्तींना लाभ : हिरानंदानी हॉस्पिटल (पवई) आणि आस्था सोशल फाऊंडेशन च्यावतीने आयोजन

रत्नागिरी : डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल (पवई, मुंबई) आणि दिव्यांगांसाठी समर्पित असलेली रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (१५ डिसेंबर) जन्मतः व जन्म पश्चात श्रवणदोष असणाऱ्या, किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठ्या वयोगटातील व्यक्तींची मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी ९ ते ४ या वेळेत आस्था थेरपी सेंटर, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, रत्नागिरी होईल.

या शिबिरात श्रवण व वाचा दोषसंदर्भात तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. या शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे या मुलांच्या ऐकण्या व बोलण्या संदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराला येताना पालकांनी मुलांच्या पूर्व तपासणीचे रिपोर्ट सोबत आणावेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही श्रवण व वाचादोष असलेले बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, लवकरात लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारानंतर मुख्य प्रवाहात यावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे, असे आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयक व स्पीच थेरपीस्ट संकेत चाळके यांनी सांगितले. जिल्ह्यातील बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी जेणेकरून कोणी सुटणार नाही, असे आवाहन आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक श्रीमती सुरेखा पाथरे यांनी केले आहे. शिबिरासाठी नाव नोंदणी पालकांनी १० ते ६ या वेळेत ९८३४४४०२०० या क्रमांकावर फोन करून करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button