नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या “तंदुरी नाईट्स २.०”चे शानदार उद्घाटन
रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे आयोजित केलेल्या “तंदुरी नाईट्स २.०” या खाद्य महोत्सवाचे काल (८ फेब्रुवारी) शानदार उद्घाटन झाले. नवनिर्माण शिक्षण संस्थेतील मोहन खातू क्रीडा संकुल येथे भरवलेल्या या खाद्य मेळ्याच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आलिमिया परकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या खाद्य मेळ्याची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार गीते, श्रीमती अपूर्वा, उद्योजक आनंद देसाई, माजी आमदार बाळ माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे गेली बारा वर्षे हा खाद्य महोत्सव भरवला जात असल्याचे सांगितले. एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातून शिकून बाहेर पडलेली मुले आज देशाबरोबरच परदेशातही यशस्वीरित्या कार्यरत असल्याचा अभिमान आहे. रत्नागिरी बरोबरच संगमेश्वर आणि दोडामार्ग येथेही हा अभ्यासक्रम सुरू आहे. कोकणातील मुलांना हॉस्पिटलिटीचा (आदरातिथ्य) अनुभव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे, असे श्री. हेगशेट्ये यांनी संगितले.

यानंतर डॉ. परकार यांनी मनोगत व्यक्त करून या खाद्य महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
“तंदुरी नाईट्स २.०” या या खाद्य महोत्सवात द सॅंडविच स्टेशन, मोमो एक्सप्रेस, होम ऑफ बिर्याणी, चिप्स अँड चॅट, कॉम्बो ट्रीट, स्पार्कलिंग स्प्रित्ज स्टेशन, तंदुरी खजाना, चिली ब्लिस अशा अनोख्या आणि विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खाद्य पदार्थांचा समावेश असून, हे सर्वच पदार्थ रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरले असल्याचा अभिप्राय अनेकांनी दिला.
दरम्यान, यावेळी या खाद्य महोत्सवात मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याला ही उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला.

आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस असून मर्यादित जागांचे नियोजन केले असल्याने चोखंदळ खवय्ये असलेल्या रत्नागिरीकरांनी लवकरात लवकर तिकीट खरेदी करून आपली जागा निश्चित करावी आणि या खाद्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, तसेच हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख ताराचंद ढोबाळे यांनी केले आहे.



