‘नवनिर्माण हाय’मध्ये डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टर्सचा सन्मान

रत्नागिरी : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज (१ जुलै) डॉ. बाबासाहेब रेणुशे, डॉ. प्रज्ञा रेणुशे, डॉ. शबाना सय्यद, डॉ. सानिका कुंभवडेकर, डॉ. बिभीषण कस्तुरे, डॉ. आशीष पानगले यांना आमंत्रित करून त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. यानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये आणि मान्यवर डॉक्टर्स यांनी झाडाला पाणी घालून केले.
यावेळी बोलताना नवनिर्माण शिक्षाण संस्थेच्या संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी वैद्यकीय सेवा कशी महत्त्वाची आहे, हे सांगून युद्धकाळात त्याचा कसा उपयोग झाला याची माहिती दिली. तसेच चार वर्षांपूर्वी आलेल्या कोविडच्या महामारीमध्ये डॉक्टर्सनी कोविड योद्धा म्हणून कशी कामगिरी बजावली याचा उहापोह केला.
डॉ. शबाना सय्यद वैद्यकीय सेवेचे महत्त्व विषद केले. डॉ. बाबासाहेब रेणुशे हे अमेरिकेतील प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’शी संबंधित असल्याने रोबोशी संबंधित माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना रंजकपणे सांगितली. डॉ. कुंभवडेकर यांनी डॉक्टर होणे सोपे नाही त्यासाठी प्रचंड मेहनत आणि खूप अभ्यास करावा लागतो, असे सांगितले. डॉ. पानगले यांनी मोह, मत्सर याचा मानवी मनावर कसा परिणाम होतो आणि आपण कसे वेगळ्या वाटेवर जातो याविषयी सविस्तर माहिती दिली मनावर होतो. निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. कस्तुरे यांनी मुलांना काही व्यायाम जीवनात कसा महत्त्वाचा आहे हे सांगून काही व्यायामांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थिनी सृष्टी कोकरे हिने आभार मानले. पूर्वा घाडी या विद्यार्थिनीने प्रास्ताविक केले. या वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



