मुख्य बातमी

३१ डिसेंबरच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क, पोलीस, एफडीए यांनी विशेष सतर्क रहावे : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक

रत्नागिरी : आज (३१ डिसेंबर) २०२४ या वर्षाचा शेवटचा दिवस असून, या अनुषंगाने उत्पादन शुल्क, पोलीस, एफडीए आदींनी विशेष सतर्क रहावे. पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी अंमली पदार्थविरोधी कसून तपासणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक काल (३० डिसेंबर) झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, खेड प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, माध्यमि‍क शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सहाय्यक आयुक्त दीपक घाटे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून, अहवाल सादर करावा. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बंद असणाऱ्या कंपन्यांबाबत तपासणी करुन अहवाल द्यावा. उत्पादन शुल्क, पोलीस विभाग, वन विभाग, उपविभागीय अधिकारी, बंदर अधिकारी यांनी हॉटेल, धाबे, बंद असणाऱ्या कंपन्या मेडिकल स्टोअर्स आदींबाबत तपासणी करावी. विशेषत: ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने दक्ष रहावे. दिलेल्या वेळेत वाईन शॉप, रेस्टॉरंट बंद होतील याबाबत सजग रहावे.

पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, नेपाळी खलाशांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होतो, त्यामध्ये बंदर अधिकाऱ्यांनी दक्ष राहून तपासणी करावी. पोलीस विभागाला माहिती देऊन संयुक्त कारवाई करावी. २४ तास सुरू असणाऱ्या मेडिकल दुकानांबाबतही एफडीएने लक्ष ठेवावे. विशेषत: बंदी असणाऱ्या औषधांबाबत सतर्कता ठेवावी. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी विषय वाचन करून माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button