साने गुरुजींच्या स्मृतिदिनी पालगड येथे समता संगर संकल्प मेळावा संपन्न

पालगड (ता. दापोली) : “गांधीजी आणि सानेगुरुजी यांची जीवन जगण्याची पद्धती अंगिकारून थोडी पावले त्यांच्या रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा,” असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी साने गुरुजींच्या स्मृतिदिनी येथे केले.
साने गुरुजी १२५ जयंती वर्षाच्या अभियानांतर्गत ११ जूनला साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी साने गुरुजींच्या जन्मगावी पालगड येथे समता संगर संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या संकल्प मेळाव्याला महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘बापूंचा क्रांतीचा जिवंत संदेश जगणारे सानेगुरुजी हे मूर्तीमंत उदाहरण आहे. समता हे दोघांच्याही विचारांचं समान सूत्र आहे. आजच्या समाजात ही समता आणण्याचे काम आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी केले आहे का? अजूनही काही समाज घटकांना तिरस्कार, भेदभाव सहन करायला लागत आहे. असा विषमतेवर आधारित समाज आपण का सहन करतो आहोत आणि असे असताना बापूंचा आणि सानेगुरुजींचा समतेचा संदेश जिवंत ठेवण्याचा दावा करण्याचा आपल्याचा हक्क आहे का? सानेगुरुजी हे महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी होते. त्यांचा मुल्यविचार पुढील पिढ्यांना देण्यासाठी कार्यरत राहुया.” गांधीजींचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य, जग्गनाथपूरी येथील मंदिर प्रवेश लढा व साने गुरुजींच्या पंढरपूर लढ्याबाबत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
संकल्प मेळाव्याची सुरुवात सानेगुरुजींच्या दापोली तालुक्यातील पालगड येथील घराच्या (साने गुरुजी स्मृतिभवनाच्या) अंगणात गुरुजींचे आवडते बकुळीचे झाड तुषार गांधी, पंढरपूर येथील तनपुरे मठाचे आनंद महाराज तनपुरे, शामसुंदर महाराज सोन्नर, हेरंब कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांच्या हस्ते लावून करण्यात आली. साने गुरुजींच्या अंगणातील मूठभर माती उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत यावेळी घेतली व आपापल्या कार्यक्षेत्रात गुरुजींच्या विचारांची रुजवणूक करण्यासाठी ह्या मातीशी आपले नाते जोडले.
सानेगुरुजी १२५ अभियानाच्या वतीने साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी तुषार गांधी यांच्याकडे गुरुजींच्या अंगणातली ही माती सुपूर्द केली. “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” असा संदेश लिहिलेल्या मातीच्या घड्यातील ही माती तुषार गांधी आगाखान पॅलेसमध्ये घेऊन जाणार आहेत. साने गुरुजींचे गांधीजींशी असलेले नाते अशाप्रकारे पुनर्स्थापित करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे, असे या प्रसंगी बोलताना तुषार गांधी यांनी सांगितले.
स्मृतिभवनाच्या बाजूलाच असलेल्या साने गुरुजी विद्यालयाच्या कलामंदिरात सुरवातीलाच सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना व राष्ट्र सेवा दलाच्या माजी विश्वस्त झेलम परांजपे आणि स्मितालयचे अंकुर बल्लाळ यांनी ‘खरा तो एकची धर्म’ या साने गुरुजींच्या गीतावर ओडिसी शैलीत नृत्य सादर केले. या नृत्याविष्काराच्या जोडीने सेवादल कार्यकर्ती प्रसिध्द चित्रकार स्नेहल एकबोटे हिने व्यासपीठावर पेंटिंग केले. आजचे निवडणूक पश्चातचे आश्वासक चित्रच तिने या गीतावर आणि नृत्यावर आधारित रेखाटले आणि आजच्या तरुणाईच्या भावना चित्राद्वारे मांडल्या.
या संकल्प मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी केले. या मेळाव्याची संकल्पना, त्यासाठी केलेले प्रयत्न तसेच मेळाव्याचे उद्दिष्ठ त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच या समता संकल्प मेळाव्यात घेतलेला संकल्प आम्ही सर्वांनी गंभारपणे घेतलेला असून या विषयावर पुढील किमान पाच वर्ष तरी काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे जाहीर आश्वासन राजाभाऊ अवसक यांनी या प्रसंगी दिले. महाराष्ट्रभरातल्या किमान ३५० शाळांत आम्ही या निमित्ताने काम करत राहू असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूर वारीतील गंगाजमनी तहजीब पुसून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे अशी खंत हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांनी विचारमंचावरुन बोलताना व्यक्त केली. पंढरपूर विठ्ठल मंदिरापासून शुद्रातीशुद्रांना बडव्यांनी सातशे वर्ष दूर ठेवले होते, त्यांचा मंदीर प्रवेश करण्याचे महत्वाचे काम सानेगुरुजींनी केले अशा शब्दात गुरुजींच्या पंढरपूर लढ्याबद्दल सोन्नर महाराज यांनी कृतज्ञता व्यक्त केली. वारकऱ्यांमध्ये व जनसामान्यांमध्ये सानेगुरुजींचे विचार नेण्यासाठी खरा तो एकची धर्म या गाण्यावर आणि महाराष्ट्राची माऊली असलेल्या सानेगुरुजींवर किर्तन करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आनंद महाराज तनपुरे यांनी पंढरपूर लढ्याला मदत करणाऱ्यांना अजूनही त्रास दिला जात आहे असे सांगून पुरोगामी संस्था, संघटनांचे पाठबळ असल्यानेच हा समतेचा लढा चालू आहे असे प्रतिपादन केले. पंढरपूर येथील तनपुरे महाराजांच्या मठात साने गुरुजींना मंदिर सत्याग्रह करण्यासाठी जागा दिली होती, तिथे आता पंढरपूर लढ्याचे स्मारक उभे राहिले आहे याची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. साने गुरुजींचे विचार केवळ विद्यार्थ्यांतच नाही तर वारकऱ्यांतही रुजविण्याची गरज आहे असे सांगून वारकरी शिक्षण संस्थांत दररोज किमान अर्धा तास साने गुरुजी विचार शिकविले जातील असे आनंद महाराज तनपुरे यांनी जाहीर केले. संत परंपरा विसरून सध्या वारकरी संप्रदाय ठराविक रंगांच्या अधिपत्याखाली आलेला दिसत आहे याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. हे असे होऊ नये यासाठी गुरुजींचे विचार वारीत सांगावेत असा आग्रह आनंद महाराज तनपुरे यांनी धरला.
महाराष्ट्राला वाटणारे साने गुरुजींचे आकर्षण का संपत नाही असा सवाल शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर शिक्षकांसाठी १२५ व्याख्याने देण्याचा संकल्प करणारे हेरंब कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणात केला. लहान मुलांची निरागसता, पारदर्शकता, अंतःकरणातील कारुण्य असलेल्या साने गुरुजींना, घरातील आपले माणूस आपण जपतो तसे महाराष्ट्राने जपले आहे असे उत्तर आपल्याच सवालाला कुलकर्णी यांनी दिले. १७ जून १९२४ला गुरुजींची शैक्षणिक कारकिर्द सुरू झाली. त्याला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात दिली. साने गुरुजींनी लोकशिक्षक बनून समाजाचे नेतृत्व केले. लोकशिक्षकाची ही भूमिका समाजाशी नाते जोडण्यासाठी शिक्षकांनी बजावायची आहे, असे आग्रही मत त्यांनी या प्रसंगी मांडले. सानेगुरुजी हे विचारवंत तत्वज्ञ होते. आजच्या इंटरनेटच्या युगात प्रेम आणि करुणा जोपर्यंत डाऊनलोड करू शकत नाही तोपर्यंत सानेगुरुजींची अपरिहार्यता कायम आहे असेही ते पुढे म्हणाले.
साने गुरुजी विद्यामंदिर, पालगडच्या संकुलात हा कार्यक्रम पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद पावसे यांनी साने गुरुजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या जन्मगावी एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील कार्यकर्ते जमले याबद्दल आनंद व्यक्त केला. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व पालगडवासियांसाठी सस्मरणीय व आनंददायी आहे, असेही ते पुढे म्हणाले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक व साने गुरुजी १२५ अभियानाअंतर्गत होत असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रभरातील काही प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रतिकात्मक सत्कार शाळेच्या वतीने याप्रसंगी करण्यात आला.
युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे गुजराथमधे कच्छच्या किनाऱ्यावर सागरशाळा चालविणाऱ्या देवेंद्र कांदोळकर यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या ‘पणती जपून ठेवा’ या पुस्तकाचे प्रकाशन या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर आणि मातृमंदिर देवरुखचे विलास कोलपे याप्रसंगी उपस्थित होते. गुरुजींचे साहित्य तसेच इतरही साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. वाचन चळवळ समृद्ध आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “मी वाचेन, इतरांनाही वाचायला सांगेन” असा संकल्प करण्याचे आवाहन मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
या मेळाव्यात इचलकरंजीच्या राष्ट्र सेवा दल सैनिकांनी साने गुरुजींच्या जीवनावर बनवलेल्या पोस्टर प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आश्विनी सातव हिने केले, तर उपस्थितांचे आभार राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या सांगता समयी “आता उठवू सारे रान” हे गुरुजींचे क्रांतीगीत पुण्यातील जेष्ठ सेवादल सैनिक दत्ता पाकिरे यांनी उपस्थितांबरोबर घेतले व या संकल्प मेळाव्याची सांगता झाली.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरवातीलाच राष्ट्र सेवा दलाच्या माजी महामंत्री आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त सिरत सातपुते यांनी उपस्थितांना संकल्प दिला. महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभरहून अधिक परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी या संकल्प मेळाव्यात समताधारित समाजरचनेचे गुरुजींनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प केला. गुरुजींनी दिलेला समतेचा विचार जनमानसात विशेषतः विद्यार्थ्यांत रुजवण्याचा विशेष प्रयत्न करण्याचा व या विद्यार्थ्यांना संविधानवादी जबाबदार नागरिक घडविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला. गुरुजींच्या क्रांतिकारी विचार आणि आचारातून प्रेरणा घेत, देशाचे समतावादी संविधान आणि त्यातील लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा प्रचार–प्रसार व जतन–संवर्धन करण्याचा तसेच समाजातील धार्मिक, जातीय विद्वेष नष्ट करण्याचा संकल्प करत, गुरुजींच्या अंगणातील मातीशी आपलं नातं जोडत, गुरुजींच्या विचारांची रुजवणूक करून प्रेमाचा पाया रचण्याचे आश्वासन एकमेकांना देत महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात परत गेले.
हा संकल्प मेळावा यशस्वी करण्यासाठी शरद कदम, सिरत सातपुते, राजाभाऊ अवसक, अल्लाउद्दीन शेख, आश्विनी सातव, विनय सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. या मेळाव्याला प्रसिध्द चित्रकार केशव कासार, सेवांगण मालवणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर, लेक लाडकी अभियानच्या ॲड. वर्षा देशपांडे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे सरचिटणीस राजन इंदूलकर, युसूफ मेहेरअली सेंटरच्या गुड्डी, कॉंग्रेसच्या गुजराथी सेलचे अध्यक्ष केतन शहा, भारत जोडो अभियानचे फिरोज मिठबोरवाला, सर्वहारा जनआंदोलनच्या उल्का महाजन तसेच माजी राष्ट्र सेवा दल विश्वस्त सुरेखा दळवी तसेच पालगडमधील शरद केळकर, डॉ. करंदीवर, गोव्याहून सुहास ठाकूरदेसाई, सावंतवाडीहून ॲड. संदीप निंबाळकर, कणकवलीहून सरिता पवार, देवरूखहून मातृमंदिराचे सतीश शिर्के, काँग्रेसचे नेते अशोकराव जाधव, चिपळूणचे लीना वरवटकर, सुनील खेडेकर, प्रयोग भूमीचे भार्गव पवार, महाडहून मिलिंद टिपणीस, पनवेलचे संतोष ढोरे, उरणचे किरण शिवकर, इचलकरंजीहून संजय रेंदाळकर, साताऱ्याहून संजीव बोंडे, कैलास, शैला जाधव, पुण्याहून विलास किरोते, संगमनेरहून रजत अवसक, सीताराम राऊत, राजूरहून बीना सावंत, नाशिकचे अलका एकबोटे, वसंत एकबोटे, धुळे येथून अनिल देवपूरकर, अमरावती येथून माया वाकोडे, ठाण्याहून वंदना शिंदे, नीता साने, अजय आनंदी महादेव, जगदिश खैरालिया, जळगावहून गोपाळ नेवे, कल्याणचे विशाल जाधव, आदी १६ जिल्ह्यातील कार्यकर्ते आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर गावातील एक रहिवाशी श्री दत्ताराम पाटणे यांच्या घरी चुलीवरच्या जेवणाची पंगत बसली होती.



