आर्टिकल

रंगयात्रीकार शेखर भुते 

रत्नागिरीतील वरीष्ठ पत्रकार, रंगयात्री साप्ताहिकाचे संपादक शेखर कुमार भुते हा या शहरातील एक वेगळ्या वाटेने जाणारा आणि लिहिते राहणारा पत्रकार होता. माझी पहिली ओळख शेखर सोबत झाली ती त्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये. एका हटके अंदाजात तो त्या काळात प्रिंटिंग प्रेस चालवत असे. काही माणसे त्यांच्या हटके शैलीमुळे कायमची स्मरणात राहतात तसाच शेखर होता. रत्नागिरीकर म्हणून त्याला फार मोठा अभिमान होता. मित्र परिवार जमविणे आणि गप्पांचे फड रंगविणे त्यात रत्नागिरी शहरातील विविध प्रश्न, समस्या, सांस्कृतिक, राजकीय उलथापालथी ते थेट अमेरिकेच्या प्रेसेडन्सी निवडणुकीपर्यंतच्या गप्पांची मैफल यात रंगत असे. मलाही या मैफलीचा लाभ काही वेळा मिळाला आहे. यांत मनमोकळेपणा आणि मित्रांबद्दल कमालीचे औदार्य हा शेखरचा गुणविशेष प्रकर्षाने जाणवत राही. त्याचवेळी रत्ननगरीच्या शाश्वत विकासाचीही काळजी.

प्रिंटिंग प्रेस सांभाळताना त्यांने पत्रकारितेतील विविध प्रयोग केले. कोकण गर्जना हे प्रकाश भाबल यांचे दैनिक दोन वर्ष त्यांने काढले. त्यात पाने भरून भरून मोठ मोठी आर्टीकल्स लिहिली. पत्रकारितेतील टोकाची टिकात्मकता हा शेखरच्या अत्यंत आवडीचा शब्दालंकार! ज्याला पार झोडून काढले अथवा पार झाडाझडती घेतली अथवा तुफानी शाब्दिक हल्ला चढविणे असेही म्हणता येईल. या क्षेत्रात शेखरची लेखणी तुफानी चालत असे. त्यातील शब्दांची आतषबाजी, अचूक आणि घायाळ करणारी शब्दांची तलवार समोरच्याला काहीवेळा पार रक्तबंबाळ करून सोडत असे; मात्र हा सारा आवेश अन्यायापोटी, भ्रष्टाचारी प्रकरणात असे. त्यामुळे शेखर च्या रंगयात्रीत नक्की कोणावर आसूड ओढला जाणार याची येथील पत्रकारितेत चर्चा असे. प्रस्थापित आणि सत्तेच्या विरोधात हा शेखरचा विशेष बाणा होता. त्यामुळे सो कॅाल्ड राजकीय मान्यवरांशी त्याचे फारसे कधीच जमले नाही.

शेखर हे एक स्वतःच्या विश्वात उभे राहिलेले आनंदमय साम्राज्य होते. त्याचा रंगयात्री हा काही विशेष विषयांवरच पानं पानं भरून असे. त्यातील त्याचे अग्रलेख हे तुफानी असत. आम्ही गमतींने त्याला निळकंठ खाडीलकरांची उपमाही  देत असू! शेखर म्हणजे कोकणच्या पत्रकारितेतील एक वेगळी शैली म्हणून विशेष उल्लेख करावा लागेल. आपल्या लिखाणाने कोणाला काय वाटेल याची त्याने कधीच तमा बाळगली नाही. कोकणातील आजच्या काळात साप्ताहिकातील पत्रकारीतेच्या मर्यादा त्याला ही होत्या; मात्र आपल्या शब्दांवर आणि आपल्या अग्रलेखावर प्रेम करणारा शेखर स्वतःवर अत्यंत खूष असे. मी रत्नागिरीकर चळवळ त्यांने जोरदार सुरू केली होती. त्या माध्यमातून काही उपक्रमही सुरू केले होते. आज अचानक शेखरचे निधन झाल्याच्या वृत्ताने धक्का बसला!

आमचा एक जूना सहकारी गेला.

शेखरला भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button