गुणपडताळणीसाठी १० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या विविध परीक्षांचा निकाल ३० एप्रिल रोजी संकेतस्थळावर घोषित केला असून, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपला अर्ज puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर १० मेपर्यंत पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांनी केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित केला आहे.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आदीमध्ये दुरूस्तीसाठी १० मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिला आहे. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरुस्ती करायची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून हे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ई-मेलवर १० मेपर्यंत पाठवावेत. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविला जाईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेला गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.



