सामंतांचा पंचम षटकार?

– अभिजीत हेगशेट्ये
जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक आहे. भाजपचे या मतदारसंघातील पारंपरिक उमेदवार अखेरच्या टप्प्यात थेट ठाकरे शिवसेनेत दाखल झाल्याने ही निवडणूक अधिकच मनोरंजक होत आहे. शेकडो कोटींच्या विकासकामांचा दावा करणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत सलग पाचव्या वेळी आपणच प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि पंचम षटकार ठोकणा, अशी ग्वाही देत आहेत. तर त्यांना पराभूत करण्यासाठी सरसावलेले माजी आमदार बाळ माने बाउंड्री लाईनवर उभे राहत हा षटकार सीमारेषेच्या आत झेल घेत सामंतांना आऊट करण्याच्या तयारीत आहेत.
सलग २० वर्षांची कारकीर्द, त्यातही सत्तेची सदैव छाया आणि मंत्रीपदाचा सरताज यामुळे ना. उदय सामंत यांनी मागील पाच वर्षांचा काळ हा त्यांच्या संकल्पनेतील विकासकामांचा अभूतपूर्व विकास पर्व आणणारा होता. या मतदारसंघात शैक्षणिक हब सुरू करण्याच्या संकल्पनेतून मेडिकल ते विविध शासकीय महाविद्यालये, पर्यटनस्थळ विकास प्रकल्पातंर्गत तारांगण ते विविध भागांचे सौंदर्यीकरण, विठ्ठलापासून छत्रपती शिवरायांपर्यत अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे पुतळे हे शहराचे विशेष आभूषण म्हणून सजले. शहर, तालुका ते मतदारसंघातील प्रशासकीय इमारती, हॅास्पिटल, रस्ते, पाणी योजना आणि विविध कामांना कोट्यवधींचा निधी आणि सुरू असणारी प्रचंड कामे, विमानतळाप्रमाणे रेल्वेस्थानकांचे सौंदर्यीकरण हे सारे नजर दीपवणारे आहे. मंत्रीमंडळाच्या अखेरच्या टप्प्यात उद्योगमंत्री म्हणून रत्नागिरीसाठीचे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्टरलाईट प्रकल्पासाठी या शहराची अनेक वर्षे पडीक राहिलेली जागा एमआयडीसीसाठी सोडवून घेणे आणि तेथे २० हजार कोटींचा आणि हजारो तरुणांना नोकरी देणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आणत असल्याचे जाहीर करणे हा तर मास्टरस्ट्रोक होता. यामुळे या विधानसभा निवडणुकीत सामंत किती रेकॅार्डब्रेक मताधिक्यांनी निवडून येणार हेच गणित बाकी होते; मात्र भाजपवासी बाळ माने यांनी उद्धव ठाकरे सेनेकडून उमेदवारी दाखल केल्याने सारीच गणिते बदलल्याची चिन्हे दिसू लागली.
बाळ माने हे आरएसएसच्या बांधीव विचारसरणीतील कमिटेड कार्यकर्ते आहेत. त्यांनी थेट विरोधी विचारांच्या महाविकास आघाडीत यावे हे गणितच अजून अनेकांना सुटले नाही. गेली २० वर्षे बाळ माने हे उदय सामंत यांच्याविरोधात तीन वेळा याच विधानसभेत पराभूत झाले आहेत. चौथ्यांदा ते सामंत यांच्यासमोर उभे आहेत. या मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे. भाजपच्या माध्यमातून ते ५०-६० हजार मतांचे अधिकारवाणीने दावेदार आहेत. या निवडणुकीत त्यांचे पारंपरिक मतदार किती ट्रान्सफर होतात, त्यांचेसोबत येतात का? हा खरा या निवडणुकीतील कळीचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शिवसैनिक हे वेगळेच रसायन आहे. ते फक्त आदेशाचे ताबेदार असतात. शिवसेनाप्रमुखांवरील श्रद्धा हेच त्यांचे बळ त्यामुळे मातोश्री जो उमेदवार देईल त्याचे जीव तोडून काम करत त्याला निवडून आणायचे हाच त्यांचा ध्यास. सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी अशी साथ असल्याने कागदावरील आकडेवारीत बाळ माने यांनी मोठ्या आशा निर्माण केल्या आहेत.
याच्या विश्लेषणात लोकसभा निवडणुकीतील मतांचा संदर्भ घेतला जातो. नारायण राणे यांना ७४ हजार ७१८ तर विनायक राऊत यांना ८४ हजार ७५५ मते मिळाली होती. या मतदारसंघात काही फॅक्टर फार प्रभावी आहेत. मच्छिमार, मुस्लिम समाज, भंडारी आणि कुणबी समाज यांतील कुणबी समाजाला निवडणुकीपूर्वी आपलेसे करण्यात शामराव पेजे स्मारक यांच्या नावे ८ कोटी देणार, २ एकर जागा देणार, भागोजीशेठ यांचा पुतळा उभारणार, विविध समाजाच्या मंडळांना एमआयडीसीत प्रत्येकी ३ ते ५ गुंठे समाजभवन जागा देणार आदी विविध योजनांचा सुकाळ होता. प्रत्यक्षात त्यातील किती वास्तवात आले ते पुढील काळच ठरवेल. पण त्यामुळे हा समाज जोडून घेण्याचा मोठा प्रयत्न सांमत यांचा होता. याचा फायदा त्यांना होणारच. त्यामुळे सामंत सहजच निवडून येतील असेच वातावरण आहे; मात्र बाळ माने यांनी आपल्या सोबत भाजपची २५-३० हजार मतांची शिदोरी येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे खरोखरच सत्यात आले तर राजकीय पटलावरील गणितांची दिशा काही वेगळी वाट पकडू शकते!
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या कोअर गटांने उदय सामंत यांना टार्गेट केले होते. वासराचे शव प्रकरणी निघालेला हिंदु आक्रेश मोर्चा, एका मुलीच्या प्रश्नावरील संतप्त जमाव, संघाच्या संचलन फेरीसमोर अल्ला हो अकबरऽऽऽ चा नारा त्यातून वाढलेला तणाव आणि वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांना दाखविलेले काळे झेंडे यांतून सामंतांविरोधात मोठे वातावरण तापविले गेले. याचे डॅमेज कंट्रोल करताना सामंत यांनी टिळक आळीत वक्फ बोर्ड कार्यालयाचे मंजुरी उद्धव ठाकरे यांनीच दिल्याचे स्पष्टीकरण करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येथील मुस्लिम मतदार हा प्रभावशाली फॅक्टर आहे. तो सर्वाधिक मच्छिमारी व्यवसायात आहे आणि सामंत यांच्यासोबत उत्तमप्रकारे जोडलेलाही आहे; मात्र मध्यंतरी योगी आदीनाथ यांनी मुंबई येथील सभेत ”बटेंगे तो कटेंगे”चा नारा देत राज्यातील सलोख्याच्या नात्याला मत्सर आणि द्वेशाचा नवा आयाम देण्याचा प्रयत्न करत, भाजप आणि महायुतीची पुढच्या रणनितीचा अंदाज दिला. यातून पुन्हा लोकसभेप्रमाणेच मुस्लिम समाज महायुतीपासून दूर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि त्याचा कोकणातील सर्वाधिक त्रास सामंत यांना होऊ शकतो. नारायण राणे यांची भूमिका ही महत्त्वाची आहे.
ना. उदय सामंत हे राज्यातील पाचव्या क्रमाकांचे नेतृत्व मानले जाते. राजकीय डाव विरोधकांवर पलटवत निवडणूक जिंकणे यात ते माहीर आहेत. त्यामुळे त्यांना ही निवडणूक फारशी कठीण नाही; मात्र सहज सोपी वाटणाऱ्या या निवडणुकीने त्यांना कडव्या स्पर्धेने मतदारसंघात जेरबंद केले आहे. त्यांचा पंचम षटकार सीमापार जाणार की तो त्यापूर्वीच बाळ माने झेलणार हे २३ तारीख ठरवेल.



