पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री

मुंबई : – जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.२२) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारत गोळ्या घातल्या. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक जारी केला असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
यावेळी ते म्हणाले की, “पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जिल्ह्यातील पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांना तत्काळ महाराष्ट्रात आणण्याकरता सरकारकडून सर्वतोपरी मदत सुरू असून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. तसेच डोंबिवलीतील तीन मृतदेहांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत. तर, पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ समन्वय साधत आहेत”, अशी महिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, “पर्यटकांशी समन्वय साधून ज्यांनी संपर्क साधलाय त्यांची व्यवस्था केली आहे. काहींना इंडिगो विमानातून आणत आहोत. तसेच, उर्वरित पर्यटकांना आणण्याकरता इंडिगोला अतिरिक्त विमान पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्याकरता आवश्यक तिकिटांची व्यवस्था मंत्री मुरलीधर मोहोळ बघत आहेत. आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे घाबरल्याने त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे”, असेही त्यांनी म्हटले.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जम्मू-काश्मीरमध्ये उपचार सुरु असून, त्यांना डॉक्टरांनी मुभा दिल्यानंतर महाराष्ट्रात आणले जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.



