
केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी ना. उदय सामंतांची घोषणा
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्हात्रे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मराठी भाषा संचालक डॉ. शामकांत देवरे, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे, सरपंच स्वेता खेऊर आदी उपस्थित होते.
विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केली. मराठी भाषा विभाग हे खातं मी मागून घेतलं आहे. कोकणाला साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषेचा मंत्री झाल्यावर माझ्या हातून मंगेश पाडगावकरांच्या गावी कवितेचे दालन पुस्तकांचे गाव, कुसमाग्रजांच्या शिरवाडे गाव पुस्तकांचे गाव सुरु करण्याचे नियतीच्या मनात असावे. साहित्यिकांचा पुरस्कार सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे दोन दिवस घेतला. विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेतले. पहिला साहित्य भूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना देण्याचे भाग्य लाभले, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
कार्यक्रमास जयु भाटकर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, सुनिल मयेकर, नलिनी खेर आदींसह साहित्यिक, ग्रामस्थ उपस्थित होते.



