
*रत्नागिरी जिल्हा बँकेचा सहकारात नवा इतिहास!*
*5 हजार कोटींचा टप्पा पार; 94 कोटींचा विक्रमी नफा*
*सलग 14 वर्षे ‘अ’ दर्जा कायम
रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भरवसा ठेवत बँकेच्या व्यवसायात विक्रमी भर घातली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 5,066.51 कोटी रुपयांवर गेला असून, यंदा प्रथमच 94 कोटी 64 लाख रुपयांचा ढोबळ नफा नोंदवण्यात आला आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहचून अधिकाधिक चांगले काम केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात कर्ज देत बँकेने त्यांना आर्थिक पाठबळ दिले असून, त्यांच्या उन्नतीसाठी मोलाची साथ दिली आहे.
ठेवी व कर्ज व्यवहारात लक्षणीय वाढ
सन 2024-25 मध्ये बँकेच्या ठेवी 2,286.87 कोटींवर पोहोचल्या असून, कर्जवाटप 2,199.64 कोटी रुपये इतके झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये 230.70 कोटींची आणि कर्जांमध्ये 195.34 कोटींची वाढ झाली आहे. एकूण व्यवसायात 426.4 कोटींची भर पडली आहे.
एनपीएवर यशस्वी नियंत्रण
बँकेचा ढोबळ एनपीए 2.91 टक्के असून, नक्त एनपीए सलग 13व्या वर्षीही 0 टक्के कायम आहे. सलग 14 वर्षे बँकेने ‘अ’ दर्जा प्राप्त करून बँकिंग व्यवस्थेत आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
व्यवसाय वाढीसोबत सामाजिक भानही जपले
बँकेच्या 76 शाखांपैकी 28 शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत असून, ग्राहकांच्या सोयीसाठी 19 ठिकाणी एटीएम व 3 मोबाईल एटीएम व्हॅन सुरू आहेत. डिजिटलीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत सातबारा उताऱ्याची सुविधा तसेच आर्थिक साक्षरता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
निसर्ग चक्रीवादळ आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, लघुउद्योजक व शैक्षणिक संस्थांना 25 लाखांपर्यंत 5% व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकीतून शिक्षण व मदतीचा हात
शैक्षणिक क्षेत्रात योगदान देताना बँकेने जिल्हा परिषद शाळांसाठी 100 संगणक संच वाटप केले आहेत. यातील 50 संच मागील वर्षी आणि उर्वरित यावर्षी वितरित करण्यात आले. आकस्मिक निधीतून विविध सामाजिक उपक्रमांसाठी 55 लाख 85 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर गौरव
रत्नागिरी जिल्हा बँकेला नाबार्ड, महाराष्ट्र शासन, बँकिंग फ्रंटीयर्स, इंटेलिक्चुअल पिपल्स फाउंडेशन दिल्ली यांसारख्या नामांकित संस्थांकडून आजपर्यंत 19 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही कामगिरी जिल्ह्यातील सहकार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्यासह उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, संचालक अॅड. दीपक पटवर्धन, राजेंद्र सुर्वे, जयंत जालगावकर, दिशा दाभोळकर, रमेश कीर, रामभाऊ गराटे आदी उपस्थित होते.



