मुख्य बातमीशैक्षणिक

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) ची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) ची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अपर जिल्हादंडाधिकारी जिल्ह्यातील सोबतच्या यादीत नमूद परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी ११ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण आदी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेशास मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.

या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button