महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारला जाणार!

  • मुंबई : कोल्हापूर शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित विशेष बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशांमुळे कोल्हापूरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाळा आहे.

सदर बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (व्हीसीद्वारे), कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (व्हीसीद्वारे), आमदार अमल महाडिक (व्हीसीद्वारे), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (व्हीसीद्वारे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेंडापार्क येथील कृषीविद्यापीठाची जागा पूर्वी शहराबाहेर होती ती आता शहराच्या मध्यवर्ती भागात आली आहे. ‘आयटीहब’सारख्या उद्योगासाठी शहरातील जागा आवश्यक असते. कृषी संशोधनासाठी शहराबाहेरील जागाही उपयोगात आणता येईल, त्यामुळेत ‘आयटीहब’साठी शेंडापार्कच्या जागेची निवड करण्यात आली आहे. त्याबदल्यात कृषी विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांच्या सोयीनेयुक्त 60 ते 100 हेक्टर एकत्रित शेतीयोग्य पर्यायी जागा, कृषी विद्यापाठाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.आवश्यकतेनुसार त्या जागेचा विकासही करुन देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने येत्या दहा दिवसात पर्यायी जागा अंतिम करावी. त्याजागेच्या हस्तांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button