मारुती मंदिर येथे पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या टायरला आग

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे भारत पेट्रोलियमच्या टँकरमधल्या मागच्या टायर मधून अचानक ज्वाला येण्यास सुरुवात झाली आणि एकच खळबळ उडाली. हा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्या जागरूक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अवघ्या काही मिनिटांत उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर हेही आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या प्रयत्नाने आग विझवण्यास मदत झाल्याने मोठा अनर्थ टळला.
ही घटना काल (१२ डिसेंबर) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथे घडली. हा परिसर रत्नागिरी शहराचा मध्यवर्ती भाग असल्यामुळे येथे नागरिकांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते. काल ही पेट्रोल करणाऱ्या टँकरचा पेटलेला टायर बघून उपस्थित सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी आधी अग्निशमन दल आणि त्यानंतर पोलीस दलाला याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर एमआयडीसी आणि रत्नागिरी नगर पालिका यांचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
भारत पेट्रोलियमच्या या टँकरच्या टायरचे लायनर घासत असल्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या वर्तवण्यात आली आहे. दरम्यान जागरूक नागरिकांमुळे टायरला पेड घेतल्याचे वेळीच लक्षात आल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले अन्यथा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.



