ईद-उल-फित्र’ सामाजिक समतेचे प्रतिक – मुजफ्फर सय्यद.

‘ईद-उल-फित्र’ सामाजिक समतेचे प्रतिक – मुजफ्फर सय्यद.
ईद म्हणजे सामाजिक स्नेहांचे व समतेचे प्रतिकच आहे. शुभेच्छा, सलाम व दुवांनी वर्षभराचे फलित आपण त्या दिवशी उपभोगतो. ईदच्या जल्लोषाचा आस्वाद लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वानांच मनमुरादपणे लुटता येतो. या पवित्र दिनी आनंदाच्या एकाही क्षणापासून कुणीच वंचित रहात नाही. कारण इस्लामची जी पाच तत्वे अनिवार्य आहेत, त्या तत्वांपैकी अत्यंत महत्वाचे ‘जकात’ हे तत्व आहे व जकात देणे हे प्रत्येक श्रीमंतांवर बंधनकारक आहे. त्यामुळेच गोर- गरीबांना त्यांचा हक्क मिळतो व ते ही ईदेच्या आनंदाचा मनमुरादपणे आस्वाद घेतात.
इस्लामचा उदयच मुळी समता, एकता, बंधुभाव, सुख-शांतीसाठी झालेला आहे. ‘इस्लाम’म्हणजे शांतीचा संदेशच आहे. इस्लामचा अर्थच मुळी आज्ञापालन असा आहे. मानवी जीवनाला इस्लामने पूर्णता प्रदान केली आहे. तसेच स्त्री व पुरुष या दोघांच्या बाबतीत समसमान व एकच दृष्टीकोन जगासमोर ठेवला आहे. सर्वशक्तीमान अल्लाह पवित्र रमजानच्या महिन्यात रोजाच्या रुपात आपल्या बंद्याची (दासाची) परीक्षा घेतो. आपल्या दासाच्या संयमाची, विवेक निष्ठेची, कर्तव्यदक्षतेची परोपरीने तो पारख करतो. या पवित्र महिन्यात प्रत्येक मुसलमान स्त्री-पुरुष आपल्या खऱ्या अधिपतीशी ईमान राखण्याचा सच्चा प्रयत्न करतो. इस्लामी सण ईद-उल-फित्र याचे खरे स्वरुप देहाने, मनाने सर्व शक्तीमान अल्लाहची उपासना करणे, ईश्वराठायी संपूर्ण त्याग, संपूर्ण बलीदानाचा हा सण आहे. हिजरी सन सुरु झाल्यानंतर केवळ अठरा महिन्यांनीच पवित्र रमजान महिन्यातील रोजे अनिवार्य करण्यात आले. अरबी भाषेतील ‘सौम’ या शब्दांचा अर्थ “मितापभोग, संयमन असा असून तो सर्व शक्तीमान अल्लाहच्या उपासनेचा एक महत्त्वाचा विधी आहे. रोजा अध्यात्मिक शुध्दीकरणासाठी अत्यंत परिणामकारक बाब आहे. प्रकाशाचा पहीला किरण दिसण्याच्या क्षणापासून ते सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे, वाईट कृत्ये न करण्याची एक महिनाभर ट्रेनिंग ईश्वरी आज्ञेने घालून दिली आहे. अर्धपोटी, पूर्णपोटी, उपाशी रहाणाऱ्या, भुकेलेल्या गोरगरीबांच्या वेदना काय असतात याचा स्वतःला अनुभव येणे गरजेचे आहे. नेमके हेच काम इस्लामने रोजाच्या रुपात अनिवार्य केले आहे. रोजामुळे सामाजिक समतेची, सद्भावाची जाणीव लोकांत निर्माण करण्याचा मूळ उद्देशच रोजात लपलेला आहे. पूर्ण दिवस उपवास पाळून अल्लाहबद्दल कृतज्ञतेची भावना जागृत करणे व सर्व शक्तीमान अल्लाहच्या अगणित देणग्यांचे व त्याच्या कृपेचे खरे मूल्य जाणीवभूत करुन देणारे रोजा हे प्रमुख अस्त्र आहे.
इस्लाम धर्म समानतेचे प्रतिक आहे. उपजीविकेच्या साधनापासून जे वंचित आहेत, जे अनाथ, पोरके, विकलांग, गरीब आहेत, वार्धक्याने जर्जर झालेले आहेत अशाना इस्लाम कधीच वाऱ्यावर सोडून देत नाही, तर अशा दुर्बल व लाचार लोकांकरीता प्रत्येक सधन व्यक्तिच्या संपत्तीतील अडीच टक्के धन ‘जकात’च्या रुपात अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे जकातच्या रुपात पैशाचे वाटप अशा रंजल्यागांजल्या लोकात होऊन त्यांना समानतेची संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते.
इस्लाम धर्म हा कुठल्याही बाह्य सजावटीवर आधारलेला नाही तर तो माणसाला न दिसणाऱ्या अशा अदृश्य ईश्वराशी अध्यात्मिक संबंधावर तो आधारलेला आहे. एखाद्या विशिष्ट समाज गटाला प्रतिष्ठा मिळविण्यासाठी इस्लामची स्थापना झालेली नाही, तर जगातील भिन्नवंशीय लोकांमध्ये आणि सर्व थरातील माणसांमध्ये जे कुणी या ईश्वराचा स्विकार करुन त्याच्या पवित्र अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (स.) शी निष्ठेने रहाण्याची प्रतिज्ञा करेल, अशा सर्वासाठी हा धर्म आहे. विश्वबंधुत्वाचा महान संदेश निर्माण करणे हाच त्यांचा मूळ उद्देश आहे. हाच उद्देश आपण नमाज, रोजा, जकात, हज या तत्वातून पहातो. ईद मिलनात ही बंधूत्वाची भावना वाढीस लागते, मानवी मन उराउरी भेटते. अंतःकरणाचे भाव या हृदयीचे त्या हृदयी कळते यातूनच समाज मनाचा सूर जुळतो. मनाची अध्यात्मिक आणि मानसिक भूक भागते. अर्थातच कर्तव्य पालनाचे खरे समाधान म्हणजेच ईदोत्सव…
समानतेचे प्रतिक म्हणजेच ईदोत्सव.


