मुख्य बातमीराजकीयलोकसभा २०२४

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकाचीही माघार नाही

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी, सोमवारी ९ पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने हे सर्वच उमेदवार आता निवडणुकीत लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विनायक राऊत, महायुतीचे उमेदवार नारायण राणे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आयरे, सैनिक समाज पक्षाचे सुरेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे मारुतीकाका जोयशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार आणि शकील सावंत, अमृत तांबडे, विनायक लहू राऊत हे तीन अपक्ष उमेदवार असे मिळून एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. विनायक राऊत यांनी चार अर्ज, तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दोन अर्ज तसेच अन्य उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. छाननीअंती हे सर्व अर्ज वैध ठरल्याने नऊ जणांची उमेदवारी अधिकृत झाली. आज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु या उमेदवारांपैकी कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात हे नऊही उमेदवार लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button