मुख्य बातमी

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्यासंस्था संचलित नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, मराठी विभागाचे प्रा. सचिन टेकाळे, प्रा. मेघना कोल्हटकर, प्रा. रूपाली तावडे यांनी कवी कुसुमाग्रज यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर प्रास्ताविक करताना प्रा. टेकाळे म्हणाले, आज प्रमाण भाषा बोलताना त्यात अनेक इंग्रजी, पारशी शब्दांचा शिरकाव आढळतो; मात्र ग्रामीण भाषेत आजही वर्षानुवर्षे चालत आलेले बोलीभाषेतील शब्दच वापरले जातात. म्हणून मराठी भाषा जागृत ठेवण्याचे काम ग्रामीण भागाने खऱ्या अर्थाने केले आहे.”

प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी आपल्या भाषेतून संवाद साधताना इंग्रजी शब्दांचा कमीत कमी वापर करा असे सांगतानाच मराठीचा शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

गुरुदेव झाडे या विद्यार्थ्याने, तर प्रा. मेघना कोल्हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी अकरावी वाणिज्य शाखेच्या मुलींनी “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत सादर केले. अकरावी कला शाखेच्या मुलांनी “वासुदेव आला हो वासुदेव आला” आणि विठ्ठलाचा अभंग आणि शेतकरी गीत सादर केले. तर मुलींनी “हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे” हे गीत सादर केले. त्यानंतर अकरावीच्या कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित ग्रामीण भागातील बोलीभाषेवर आधारित स्किटचे सादरीकरण केले.

सूत्रसंचालन अद्वैत शेट्ये आणि आभार प्रदर्शन श्रुती चव्हाण या विद्यार्थ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button