मुख्य बातमी

मच्छीमारांसाठी पडवे येथे ट्रान्सपॉन्डर उपकरणाचा जनजागृतीपर कार्यक्रम

रत्नागिरी : रिलायन्स फाउंडेशन आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी ट्रान्सपॉन्डर (Transponder) उपकरणाच्या जनजागृतीचा कार्यक्रम पडवे (ता. गुहागर) गावात आयोजित करण्यात आला होता.

मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या सुरक्षिततेसाठी मासेमारांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसाविण्यास रत्नागिरी मस्त्यव्यवसाय विभागाने सुरुवात केली आहे.

यावेळी गुहागर येथील परवाना अधिकारी स्व. बा. चव्हाण यांनी मासेमारांना ट्रान्सपॉन्डर उपकरणांची इत्यंभूत माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जसे की, आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास नौकांवर खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश कसा पाठवता जातो व त्यामुळे मदत मिळण्यास कसे सोपे होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो. त्यानुसार नौकेवरील नभमित्र ॲपद्वारे नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त होतो.

ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविणे हे नौका मालक तसेच मासेमारी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बंदरनिहाय नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याचे काम आहे. हे उपकरण बसविण्यासाठी मच्छिमार संस्था आणि नौकाधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी केले आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशन मासेमारांसाठी दररोज सागरी हवामानाची माहिती, वादळाची पूर सूचना, मस्त्यव्यवसाय विभागाच्या योजना, ट्रान्सपॉन्डर उपकरणांची जनजागृतीपर माहिती आदी माहिती ध्वनी संदेश व व्हाट्सॲपच्या माध्यमातून मच्छीमारांपर्यंत तात्काळ पोहचवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच मच्छीमारांना सागरी सुरक्षा, मासेमारीसाठी उपयुक्त उपकरणांची प्रशिक्षण देत असल्याबद्दल सांगितले.

या कार्यक्रमासाठी गुहागरचे सुरक्षा पर्यवेक्षक वि. ऋ. शिंदे, सुरक्षा रक्षक व सागरमित्र राजन शिंदे, अंकेश चिंगडे, परिमल तोडणकर, रिलायन्स फाउंडेशनचे गौरव जाधव, पडवे सहकारी मच्छीमार संस्थेचे चेअरमन मुदस्सर खले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button