
रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेच्या मैदानावर अनेक वर्षानंतर भव्य असा रोजगार मेळावा भरला. नोकरीची सुवर्ण संधी आपल्यालाही मिळणार ह्या अपेक्षेने संपुर्ण जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने बेरोजगार या मेळाव्याला सकाळपासून उपस्थित होते. जवळपास दहाहजारपेक्षा अधिक बेरोजगार तरुण तरुणींची नोंदणी रत्नागिरी येथील या मेळाव्यात अधिकृत पणे झाल्याची आकडेवारी जाहिर करतांनाच २,१४० बेरोजगांना नोकरीचे ॲाफर लेटर दिल्याचे मा. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जाहिर केले. या रोजगार महामेळाव्यात मुलाखती झालेल्या एकुण उमेदवारांपैकी ५० टक्के बेरोजगार तरुणांना चक्क नोकरी मिळण्याची संधी मिळणे ही जिल्हयाच्यांच नाही तर देशाच्या इतिहासातील विशेष नोंद घ्यावी अशी घटना आहे. मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांच्या वाढदिवसांनिमित्ताने ना. उदयजी सामंत यांनी त्यांना दिलेली ही विशेष भेट असा त्याचा उल्लेख होत आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि बेळगाव सीमा भागात हा फॅार्नुला वापरुन बेरोजगारीवर मात करणारा मोठा पर्यायच या माध्यमातून समोर येणार आहे. देशाला आणि येथील तरुणांना ज्या बेरोजगारीच्या प्रश्नांने ग्रासले आहे. त्याला खर्या अर्थाने हा सर्वोत्तम पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
ना. उदय सामंत यांच्या या रोजगार महामेळाव्याच्या संकल्पनेचे कौतूक राज्य पातळीवर होत आहे. या निमित्ताने निर्माण होणार्या काही प्रश्नांना आम्ही कसे सामोरे जात आहोत हे ही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. यापुर्वी, झाली त्याला अनेक वर्षे, राज ठाकरे यांचा भव्य असा उद्योग -रोजगार मेळावा अती भव्य स्वरुपात शिर्के प्रशालेच्या प्रांगणात झाला होता. संपुर्ण महाराष्ट्रात या रोजगार मेळाव्याची मोठी चर्चा झाली. रकानेच्या रकाने भरुन बातम्या आल्या. येथे आलेल्या हजारो तरुणांना आपणाला नक्कीच नोकरी मिळेल. तो राज यांचा शब्द होता. तो चुकीचा कसा ठरेल. असा ठाम विश्वास होता. महिने गेले, वर्षही निघून गेली. रोजगाराची पाहिलेली स्वप्नेही अंतर्मनात विरुन गेली. पुन्हा त्या मेळाव्याची चर्चाच झाली नाही. नंतर अनेक वर्षानी राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा हा त्यांच्या येथील अटकेनेच गाजला. त्यामुळे आमच्या नोकरीचे काय? असा प्रश्न त्यांना कोणी येऊन विचारण्याचा प्रश्नच आला नाही.
मात्र या मेळाव्याची तुलना त्या मेळाव्याशी होणे सुतराम शक्यता नाही. याचे मुख्य कारण या रोजगार महा मेळाव्यात स्वतः सरकारच्या पुढाकारानेच झाला आहे. या जिल्ह्याचे पालक मंत्री, राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांनी यातील प्रत्येक बाबीकडे अगदी बारकाईने लक्ष देऊन या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील १३० कंपन्याचे एचआर आणि रिक्रुटमेंट टीम येथे येणार्या उमेदवारांच्या मुलाखती आणि निवड करण्यासाठी उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात ॲानलाईन नोंदणी ७८०० युवकांनी केली तर ३,००० जणांनी ॲाफलाईन नोंदणी केली. या पैकी ४,२२८ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या त्या पैकी २,१४० उमेदवारांना नोकरीची ॲाफर लेटर देण्यात आली. २,०८८ जणांना कौशल्य विकास विभागाकडे प्रशिक्षणासाठी नोंद करुन घेण्यात आली. याचा अर्थ येथे आलेल्या प्रत्येकाची योग्य दखल घेण्यात आली आणि त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत जाण्याचा मार्ग अधिक सुकर करण्याचे व्यापक असे माध्यम उभारले गेले. खर्या अर्थान जिल्ह्यातील तरुणांला रोजगाराच्या शोधात वणवण हिंडत असतांना ना. सामंत यांनी रोजगाराच्या संधी त्याच्या समोर आणून उभ्या केल्या आहेत. २०२३ च्या कार्यकाळातील ही फार मोठी अचीवमेंट मानावी लागेल. अर्थात या संधीचा म्हणजेच नोकरीच्या मिळालेल्या ॲाफरचा उपयोग या उमेदवारांनी करुन घेणे हे महत्वाचे आहे. अन्यतः लांब जावे लागते, आता इतके तास काम शक्य नाही, हे अवजड आहे अशा बतावण्या करत राहीले तर मात्र त्यांच्या समोर आलेली संधीचा फायदा त्यांना करुन घेता येणार नाही.
या निमित्ताने जिल्ह्यातील बेरोजगारीच्या भीषण संख्येचा प्रश्न किती गंभीर आहे याचे वास्तव समोर आले आहे. रोजगार मेळाव्याला आलेले उमेदवार हा हिमनगाचा एक भाग आहे. एका बाजूला कोकणात उच्च शिक्षित , स्किल उमेदवार मिळत नाहीत. त्याचवेळी हेल्पर आणि श्रमाची कामे करणारे उमेदवारही मिळत नाहीत. अशा येथील छोटे मोठे व्यवसायीक आणि उद्योजकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच आबां बागायती आणि मच्छिमारी उद्योग जो या जिल्ह्याला वर्षाला दिड ते दोन हजार कोटींचे परकीय चलन मिळवून देतो तेथील स्किल आणि अनस्किल रोजगारात तामीळनाडू, आंध्र, नेपाळ येथील हजारो तरुण आपला रोजगार शोधतात. त्याचवेळी कोकणातील खेड्या पाड्यातील वाडी वस्त्यावरील तरुण आज मोठ्या प्रमाणावर नोकर्यांसाठी मुंबई पुण्याकडे धावतांना दिसत आहे. यात सध्या मुलींचे स्थलांतर होण्याचे प्रमाण फार मोठे आहे. विशेषतः संगमेश्वर, चिपळूण, खेड, लांजा या भागातील महिला आणि १०-१२वी शिकणार्या मुली मुंबई गाठतात. तेथे ४-५ घरांतील हाऊसकिपीगं काम त्याना किमान १२-१५ हजारांची तजवीज करुन देतो. येथे रहाणार्या मुलांना लग्न करण्यासाठी मुलगी तयार होत नाही त्यामुळे मुलेही मुंबई पुण्याकडे मिळेल त्या नोकरीच्या शोधात जात रहातात. हे मायग्रेशनचे प्रमाण गेल्या १० वर्षात विलक्षण वाढले आहे. कोविड काळात मुंबईकर चाकरमान्यांना कोकणातील गावाकडचं घर आणि शेत हा मोठा आधार होता. चाकरमानी गावाकडे परतला, येथे रमला, येथील शेती फुलवू लागला, असा अशावाद जागला होता. मात्र पुन्हा त्यापेक्षा वेगाने कोकण मुबंईकडे धावू लागला आहे. हे स्थलांतर फार धोकादायक आहे.
या निमित्ताने ना. सामंत यांनी कोकणी मानसिकता आणि येथील रोजगाराच्या संधी याबाबत मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत. रत्नागिरीच्या समुद्र किनारी लक्ष्मी मित्तल यांच्या माध्यमातून स्टिल इडस्ट्री, रत्नागिरीत सज्जन जिंदाल यांच्या मार्फत इलेक्ट्रॅानिक्स हब उभारणे अशा आकर्षक आगामी संधी मांडल्या आहेत. या इंडस्ट्री येतांना त्यांचे स्वागताची भूमिका कोकणवासीयांनी घेतली पाहिजे कोकण वासीयांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे मोलाचे आवाहन त्यांनी केले आहे.
ना. सामंत यांनी मांडलेली भूमिका काही अंशी योग्य मानली तरी, आज जो कोकणवर सातत्याने आरोप केला जात आहे की कोकणी माणूस हा उद्योगाला विरोधच करत रहातो. हे पुर्णतः योग्य नाही. राज्यकर्ते कोणीही असले तरी त्यांची कोकणाकडे बघण्याची भूमिका ही कोकण हा जंगल आणि कोणतेही नगदी कॅश क्रॅाप पीक देणारा नाही, माळराने पडीक आहेत आणि त्याला कचरा टाकण्यासाठी मोठा समुद्र आहे. त्यामुळे येथे इतर भागाला नको असणारे कारखाने टाका, यापुर्वी ना. देवेंद्रजी फडणविस मुख्यमंत्री असतांना पुर्ण कोकण बेल्ट केमिकल कॅारिडॅार करण्याची घोषणा केली होती. त्याला तिव्र विरोध होताच ते थांबले. लोटे केमिकल प्रकल्पातून कोकण उध्वस्तच झाला आहे. लोट्याच्या कारखान्यांनी रोजगार दिला त्यापेक्षा अधिक संपूर्ण दाभोळ खाडी उध्वस्त केली आणि शेकडो कुटूंबांचा मासेमारीवरील रोजगार उध्वस्त केला. यातील येथील राजकारण्यांची दुटप्पी भूमिका आणि नरकाश्रू ढाळण्याच्या लकबी आजही जनतेच्या लक्षात आहेत. कोकणातील खर्या अर्थाने रोजगार मिळवून देणारा बदल करावयाचा असेल तर त्यासाठी पर्यटन, बंदर, मच्छिमार, आंबा, काजू प्रक्रिया या प्रमुख उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. शासनाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणे आणि त्यासाठी बेसीक उत्तम दर्जाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. आज या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे ना. उदयजी सामंत यांचे मंत्रीमंडळातील असणारे उच्च दर्जाचे उद्योग खाते आणि त्यांची राजकीय शक्ति हे बदल निश्चितच घडवून आणू शकतात त्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची सृजनशील सकारात्मकता प्रभावी ठरु शकते.


