आर्टिकल

राजकीय साक्षरता गरजेची

लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के

आज राजकीय क्षेत्रात जाहीरपणे एकमेकांची लक्तर वेशीवर टांगण्याचे उद्योग सर्वत्र सुरू आहे. ज्याचा सर्व सामान्य माणसाच्या जगण्याशी काहीही संबंध नाही. एकमेकांचे वैयक्तिक वस्त्रहरण करणे हेच आजच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. भाषेचा स्तर आणि दर्जा लज्जास्पद झाला आहे. काही सन्माननीय राजकीय नेत्यांचा अपवाद वगळता सर्वत्र हिनकस राजकारण सुरू झाले आहे.

यामुळे राजकारणाची प्रतिमा जनमानसात प्रचंड नकारात्मक झाली आहे. संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास राजकीय क्षेत्रातील लोकांनी गांभीर्याने केला पाहिजे विनाकारण अस्मिता,संस्कृती इतिहासाच्या नावाने समाजमन कलुषीत केले जाऊ नये ही अपेक्षा गैर नाही. संस्कृती आणि इतिहासाचे विवेकभान असणारा समाजच समृद्ध होऊ शकतो.

बहुसंख्य सामान्य लोक देखील राजकीय निरीक्षर आहेत. राजकीय लोकांची टिंगल टवाळी करण्यात लोकांना मजा वाटते. आम्ही राजकीय नाही/ आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही असे म्हणण्यात देखील लोकांना मोठे भूषण वाटते. अशा लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की राजकीय असणे वाईट नसते . आपण देशाचे नागरिक होतो तेव्हा आपोआप राजकीय झालेलो असतो. म्हणजे आपल्या जगण्याचा राजकारणाशी दैनंदिन संबंध आहे. राजकीय असणे म्हणजे निवडणूक लढवणे एवढ्या पुरते मर्यादित नसते. धोरणात्मक समज महत्वाची असते. नागरीक म्हणून राजकीय भुमिका, मुत्सद्दी पणा, मत ( Vote) आणि जबाबदारी महत्त्वाची असते. राजकारण आणि राजकारणी लोकांना शिव्याशाप देऊन किंवा त्यांची टिंगल करून काहीच साध्य होत नाही. आपल्या देशात राजकारणाला तुच्छ लेखणार्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. हे वास्तव राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींसकट सामान्य लोकांनीही लक्षात घेतले पाहिजे.

राजकीय साक्षरतेसाठी राजकीय पक्ष आणि सिव्हिल सोसायटी ने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी देखील याकामी पुढाकार घेतला पाहिजे. तरच राजकीय साक्षर आणि जबाबदार नागरिक निर्माण कार्य अविरत सुरू राहील. केवळ संविधान वाचवा म्हणून चालणार नाही. समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक राजकारण, संसदीय राजकारण , पर्यावरण , आरोग्य, रोजगार , उद्योग, व्यापार इत्यादी विषयांशी संबंधित धोरणे अशा बाबतीत राजकीय दृष्टीकोनातून साक्षरता वाढली पाहिजे. आणि हे काम विवेकाने झाले पाहिजे. यात कुठलाही अभिनिवेश येता कामा नये.

राजकीय निरक्षरता ही देशासाठी घातक बाब आहे. राजकीय निरक्षरता असलेल्या देशाचे भवितव्य संकटात असते याचा विचार करून सर्वांनी राजकीय साक्षर झाले पाहिजे.

©️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button