मच्छीमारांनी सहायक आयुक्तांकडे मांडल्या ड्रोन कारवाईच्या व्यथा

मच्छीमारांनी सहायक आयुक्तांकडे मांडल्या ड्रोन कारवाईच्या व्यथा
रत्नागिरी:रत्नागिरी समुद्र किनारी गस्त घालणार्या ड्रोनकडून दहा वावच्या बाहेर समुद्रात मासेमारी करणार्या मासेमारी नौकांची छायाचित्र घेतली जात आहेत. किनार्यावरून समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या नौकांचे चित्र घेऊन दहा वावाच्या आत मासेमारीचा दोष ठेवून दंडात्मक कारवाई होत आहे. यासंदर्भात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती मच्छीमारांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे केली. मच्छीमारांच्या या संदर्भातील मागण्यांचे निवेदन आल्यानंतर ते वरिष्ठ पातळीवर पाठवून देऊ, असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांना दिले.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी 10 जानेवारीपासून समुद्र किनार्यावर ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. यासंदर्भातील अडचणी सांगण्यासाठी मच्छीमारांनी सहायक मत्स्य आयुक्तांची गुरुवारी भेट घेतली. मच्छीमार नेते इम्रान मुकादम, दिलावर गोदड, काँग्रेस नेते दीपक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी ड्रोन कारवाई संदर्भात आपल्या व्यथा मांडल्या.



