क्षेत्रीय संमेलनातून निसर्ग रक्षणाचा संदेश
तब्बल ५१ वैदिकांनी घेतला नागचाफा लागवडीचा ध्यास

रत्नागिरी : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक चे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय वैदिक संमेलन नुकतेच रत्नागिरीत संपन्न झाले. या संमेलनाच्या सांगता समारंभाच्या वेळी मधुरांगण फाउंडेशनतर्फे कैलास नागचाफा रोप निःशुल्क वितरीत करण्यात आले.
आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक ४ राज्यातील विविध भागांतून वेदपाठ शाळेतील अध्यापक, मंदिर पुजारी, वैदिक क्षेत्रातील अभ्यासक या संमेलनासाठी आले होते. संमेलनाच्या सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने मधुरांगण फाउंडेशनच्या वतीने खास वैदिक मान्यवरांसाठी नि:शुल्क नागचाफा रोप वितरीत करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनीही नागचाफा रोप घेत विश्वविद्यालयाच्या प्रांगणात लागवड करण्याचा ध्यास घेतला.
संगमेश्वर तालुक्यातील मधुरांगण फाउंडेशन या संस्थेतर्फे ५१ कैलास नागचाफा या औषधी वनस्पतीचे वितरण केले. कोकणातील दुर्मिळ अशी ही बहुगुणी औषधी वनस्पती म्हणजे कैलास नागचाफा, याचे अनेकविध आजारांवर उपाय म्हणून उपयोग केला जातो, जसे की उच्च रक्तदाब कफ विकार त्वचा विकार व सौंदर्यप्रसाधनात केला जातो.
या बहुगुणी कैलास नागचाफा पवित्र वृक्षाचे वितरण मधुरांगण फाउंडेशन संस्थेच्या उपाध्यक्षा वैदही किरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या रोपांचे वितरण केल्यामुळे कैलास नाग चाफा आणि त्याचे महत्त्व रत्नागिरीतील गावांमध्ये तसेच उज्जैन, परळी वैजनाथ, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, हैदराबाद अशा विविध वेदपाठ शाळा अशा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.
या कार्यक्रमप्रसंगी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले. मधुरांगण फाउंडेशन संस्थेच्या उपाध्यक्षा वैदेही किरवे, ओंकार किरवे, श्री. नाचणकर आदी उपस्थित होते.



