संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीतर्फे हातीस येथे रुग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन

रत्नागिरी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सुप्रसिद्ध हातीस गावातील पीर बाबरशेख यांच्या उरुसानिमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशावेळी एखाद्या भाविकावर काही आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर त्याला तात्काळ मदत देण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचा हातीस येथे रुग्ण सेवा केंद्र सुरू असते. ही सेवा गेली ७ वर्षे विनामूल्य अखंडपणे चालू आहे यंदाही १२ व १३ फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

या सेवा केंद्राचा शुभारंभ बाबरशेख ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, डॉ. दिलीप नागवेकर, माजी अध्यक्ष तुषार नागवेकर, महेश कीर, नितीन शिवणकर, नरेंद्र नागवेकर आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या सेवेबाबत येथील ग्रामस्थ मंडळाने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे कौतुक करून आभार मानले. यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे समाज सेवा अधीक्षक रेशम जाधव उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, एस. टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उरुसासाठी येणाऱ्या भाविकांना काही मदत हवी असल्यास आमच्या हातीस दर्गा समोरील सेवा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले आहे.



