रत्नागिरी पोलीस दलातर्फे नवीन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने आज (७ फेब्रुवारी) नवीन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, प्राचार्य मकरंद साखरकर , प्रा. चित्रा गोस्वामी, प्रा. ॲड. सोनाली खेडेकर, ॲड. आशिष बर्वे, प्रा. सुनील गोसावी यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना मान्यवर मंडळींनी विविध कायद्यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये पोक्सो कायदा, विशाखा समिती, निर्भया समिती, लहान मुला-मुलीचा लैगिंक छळ अशा अनेक क्रुत्याचे प्रकार सांगून कायद्यात झालेल्या अमुलाग्र बदल, बदललेल्या कायद्यांचा उद्देश व कायद्याचा धाक व नमूद केलेल्या शिक्षेबाबत माहिती दिली.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) या कायद्यातील तरतुदी, मोबाईलचा वापर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर व त्यातून निर्माण होणारे दखलपात्र अपराध याबाबत सखोल विश्लेषण करून माहिती दिली. पाठलाग, ऑनलाईन पाठलाग, धार्मिक पोस्ट, धर्माचा अपमान करणारे ईमेज-मेसेज व्हिडीओ फॅारवर्ड करणे, प्रसारित करणे याचे देखील गांभीर्य समजावून सांगण्यात आले.
ऑनलाईन फ्रॅाड, लिंकवर क्लिक, ओटीपी शेअर, आलेल्या मेसेजची/व्हिडीओची खात्री याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. बीएनएसएसमधील इलेक्ट्रॉनिक पुरावे त्याचे महत्त्व कायद्यात मान्यता व शिक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयीन स्तरावर महिला कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे याबाबत सूचना करण्यात आल्या.

या कार्यशाळेला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर, आयपीएसएस निखील पाटील, शहर पोलीस निरीक्षक शिवरकर आदी उपस्थित होते.



