शेखर घोसाळे यांचे साळवी स्टॉप येथील शाखेत जल्लोषात स्वागत
उदय बनेंची उपस्थिती लक्षवेधी : सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या तसेच शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शहराचे मुख्य द्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील शिवसेना शहर शाखा क्र. १ येथे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. विधानसभेला रत्नागिरी मतदारसंघातून इच्छुक असलेले मात्र आयत्या वेळी तिकीट नाकारल्यामुळे नाराज असलेले ठाकरे सेनेचे ज्येष्ठ शिवसेना नेते उदय बने यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
१ मे १९९५ साली ज्यांच्या जोरावर ही शाखा उभी राहिली त्या जुन्या शिवसैनिकांनी आवर्जून उपस्थित राहत शेखर घोसाळे यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये सुभाष वैद्य, बाळू जाधव, उदय बने, मिलिंद सुर्वे, बावाशेठ सावंत, विजय देसाई आदींचा सामावेश होता.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शाखेमध्ये प्रवेश करतेवेळी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. घोसाळे यांनी शाखेत प्रवेश करताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उपस्थितांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दरम्यान, ठाकरे सेनेचे निष्ठावंत म्हणवणारे आता इतर पक्षात जात असतानाच पक्षासाठी केलेल्या या नवनियुक्त्यांमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य शिवसैनिकांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, हा उत्साह आणि नवी उमेद घेऊन ठाकरेंचे शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सर्वसामान्य शिवसैनिक उपस्थित होते.



