मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ६७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ६७ वा वर्धापन दिन ५ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या प्रधान कार्यालयात श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली होती.

या कार्यक्रमासाठी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव व सर्व संचालक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैयक्तिक सभासद राजाभाऊ लिमये, माजी संचालक, माजी अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त बँकेचे ग्राहक, – हितचिंतक व पत्रकार यांनी उपस्थित राहून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी, या बँकेची स्थापना दि. २४ मे १९५७ मध्ये झाली. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा हा मंडणगड ते बांदा म्हणजे सध्याचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा असा एकत्रित होता. बँकेची नोंदणी झाल्यानंतर जवळजवळ दीड वर्षाने म्हणजेच ५ डिसेंबर १९५८ रोजी बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली. त्यानंतर बँकेची आर्थिक प्रगती सुरू असतानाच बँकेचे विभाजन होऊन १ जुलै १९८३ रोजी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी अशी नोंदणी झाली.

सद्यस्थितीत बँकेच्या २ विस्तार कक्षांसह जिल्हाभरात एकूण ७७ शाखा आहेत. प्रधान कार्यालयासह तालुकास्तरावरील व तालुक्यातील शाखा मिळून २५ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. तसेच बँकेच्या प्रधान कार्यालयाची चार मजली सुसज्ज इमारत आहे. जिल्ह्यात १९ शाखांमध्ये एटीएम सेंटर्स कार्यान्वित असून, ३ तालुक्यांना मिळून एक, अशा ९ तालुक्यांसाठी ३ मोबाईल एटीएम व्हॅन्स् कार्यरत आहेत. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण दुर्गम भागांतील ग्राहक, शेतकरी, व्यापारी व नागरिकांना बँकिंग सेवा पुरविण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे बँकेने आर्थिक समावेशिकरण योजनेअंतर्गत ९ तालुक्यांच्या ठिकाणी आर्थिक साक्षरता केंद्रे कार्यान्वित केली आहेत. बँकेने रिझर्व्ह बँकेचे व नाबार्डचे मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यामुळे बँकेला राज्य शासनाचे “सहकारनिष्ठ” व “सहकार भूषण” या दोन पुरस्कारांव्यतिरिक्त अन्य विविध संस्थांकडून १५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकताच लोकसत्ता संघर्ष या संस्थेकडून “बेस्ट सीईओ अर्थविश्व पुरस्कार” जाहीर झालेला आहे.

बँकेने सामाजिक बांधिलकीतून जिल्हा परिषद शाळांसाठी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसहीत सन २०२३-२४ मध्ये ५० संगणक संच व सन २०२४-२५ मध्ये ५० संगणक असे एकूण १०० संगणक जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केलेले आहेत. अशाच पध्दतीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नेहमीच जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रमांना आर्थिक सहाय्य केले जात आहे तसेच आपत्तीच्या काळात बँकेकडून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

बँकेची प्रगती करावयाची असेल व स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर काळानुरूप बँकेने ग्राहकांसाठी अद्ययावत बँकिंग सुविधा पुरविणे आवश्यक असल्यामुळे, बँकेने RTGS, NEFT, ATMRuPay Card, SMS Alert, POS Transaction, E.Com, Cibil Report, Missed Call Alert, Card Safe, CTS, IMPS, Mobile Banking, QR Code, UPI आदी अत्याधुनिक बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत.

बँकेच्या सर्व सभासद, खातेदार, ग्राहक व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच बँकेला प्रगती साध्य करता आली आहे. यापुढेही आपणा सर्वांकडून असेच सहकार्य मिळेल, अशी बँकेच्यावतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button