राजापूर तालुक्याचे होणार विभाजन
नवीन तालुक्याच्या निर्मितीसाठी शासनस्तरावर हालचाली : अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल व रायपाटण येथे बैठकीचे आयोजन

राजापूर : तालुक्यातील पाचल, रायपाटण या पूर्व भागाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजत असताना व प्रशासकीय कार्यालयासाठी पाचल व रायपाटण या दोन्ही गावांमध्ये चढाओढ सुरू असताना आता दोन्ही गावांतील ग्रामस्थांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यासाठी प्रांताधिकारी डॉ. जैसमिन यांच्या उपस्थितीत २७ जानेवारी रोजी पाचल व रायपाटण ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल की रायपाटण गावची निवड होते ते स्पष्ट होणार आहे
सह्याद्रीच्या टोकापासून ते अरबी समुद्रापर्यंत विस्तार असलेला राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठा आहे. राजापूर शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, यापासून सुमारे ३५ ते ४० किलोमीटरच्या अंतरावर गावे वसलेली आहेत. त्यातच पूर्व परिसरात सह्याद्रीच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागात वसलेल्या गावातील नागरिकांना शासकीय कामासाठी शहराच्या ठिकाणी येताना खूप गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याचे विभाजन करून पूर्व परिसरासाठी नवीन तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने रायपाटण व पाचलवासीयांकडून करण्यात येत आहे.
रायपाटण गावाने स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसाठी मंत्रालयात प्रस्तावही सादर केला आहे. यापूर्वी झालेल्या अधिवेशनांमध्येही रायपाटण तालुका निर्मितीबाबत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता; मात्र प्रत्येकवेळी आर्थिक अडचण पुढे करून शासनाने वेळ मारून नेली होती. त्यामुळे मधल्या काळात तालुका विभाजनाचा प्रश्न मागे पडला होता. त्यानंतर सन २०१५ साली शासनाने २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
दरम्यान पूर्व परिसरात रायपाटण व पाचल ही दोन मोठी गावे असून तालुक्याचे ठिकाण आपल्याच गावात व्हावे यासाठी या दोन्ही गावांमध्ये चुरस आहे. या विभागातील महत्त्वाची शासकीय कार्यालये पाचल परिसरात असल्याने व याठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्याचे ठिकाण आपल्याच गावात व्हावे, अशी पाचलवासीयांची मागणी आहे. तर नवीन तालुका झाल्यानंतर शासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी लागणारी आवश्यक जागा रायपाटण येथे आहे. त्यामुळे ही बाब रायपाटणच्या पथ्यावर पडणारी आहे. प्रशासकीय कार्यालय रायपाटण येथे व्हावे, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे.
रायपाटण आणि पाचल यांच्या या वादात नव्या तालुक्याच्या निर्मितीचा प्रस्ताव धुळखात पडला होता; मात्र आता शासनाने अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल व रायपाटण ग्रामस्थांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार अप्पर तहसील कार्यालय कोणत्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात व्हावे, याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. जैसमिन यांनी २७ जानेवारी रोजी पाचल व रायपाटण ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्मिती करायची झाल्यास शासन रायपाटण व पाचल यापैकी कोणत्या गावाला झुकते माप देते, हे या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.



