गुहागरचा पुढील आमदार कुणबी समाजाचा : पांडुरंग पाते

गुहागर : “तालुक्यामध्ये ६० ते ७० टक्के असलेल्या समाजाला तुम्ही सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवायची असे बोलणाऱ्यांना आता ही योग्य वेळ आली असून आपल्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत यामुळे गुहागरचा पुढील आमदार हा कुणबी समाजाचा असेल,” असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांनी केले.
लोकनेते स्वर्गवासी रामभाऊ बेंडल यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. यावेळी पुढील आमदार कुणबी समाजाचा, बहुजन समाजाचाच असेल, असा संकल्प करण्यात आला.
श्री. पाते म्हणाले, “आपल्या समस्या सोडवण्यासाठी अधिवेशनामध्ये एकाही प्रतिनिधीने आवाज उठवला नाही. त्यामुळे आपला हक्काचा बहुजन समाजाचा आमदार निवडून देण्याची आज वेळ आली आहे. आपण स्वर्गवासी रामभाऊ बेंडल यांना अभिप्रेत असलेली विकास संकल्पना राबवण्यासाठी आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी असावा असा संकल्प आज आपण करूया. आज सगे सोयरेच्या माध्यमातून सरसकट कुणबी दाखले देण्याचा घाट सरकारने घातला आहे. या विरोधात आवाज उठवून अधिवेशनामध्ये एकाही आमदाराने यावर भाष्य केले नाही. त्यामुळे आपल्या समस्या विधानसभेमध्ये जाऊनच सोडवता येतील.”
माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी रामभाऊ बेंडल साहेबांचे कार्य मी जवळून पाहिल्याने त्यांच्याच प्रेरणेने मी राजकारणात पडल्याचे सांगितले. अनेकवेळेला त्या-त्या भूमिकेतून आपण गेलो आहोत; परंतु आपले प्रश्न सोडविणार कोण याचे उत्तर आपल्याला शोधून काढण्याची वेळ आज आली आहे. केवळ नावलौकीक मिळविण्यासाठी आपण विधानसभा लढवायची नसून, आपले अनेक प्रलंबित प्रश्न व बहुजनांच्या विकासासाठी यावेळी हक्काचा आमदार निवडून आणायचा असल्याचे राजेश बेंडल यांनी सांगितले.



