थिबा राजाकालीन बुद्ध विहार ट्रस्टचे पितळ उघडं पडलं : अमोल जाधव
भीम युवा पँथर संघटनेची पत्रकार परिषद

रत्नागिरी : नुकतीच थिबा राजा बुध्द विहार विकास ट्रस्टची पत्रकार परिषद झाली होती. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांनी ट्रस्ट रद्द झालेला नाही असे वक्तव्य केल्यानंतर घेऊन भीम युवा पँथर संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी (२१ जानेवारी) पत्रकार परिषदेचे आयोजन केले. ट्रस्टच्या कारभारावर भीम युवा पँथर संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी ट्रस्टने बोलावलेल्या १२ जानेवारीच्या बैठकीत जे घडले ते सर्वच पत्रकार परिषदेमध्ये सांगून ट्रस्टचे पितळ उघडं पाडलं आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
समाजस्तरावर १२ जानेवारी रोजी झालेल्या भर बैठकीत अध्यक्ष प्रकाश पवार यांनी ट्रस्ट रद्द करण्याबाबत विधान केले होते. त्यानंतर मात्र १७ जानेवारी रोजी थिबा राजा कालीन बुध्दविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टने प्रेस कॉन्फरन्स घेवून आम्ही असे बोललोच नाही असा घुमजाव केला. यावर बोलताना भीम युवा पँथरचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी बैठकीनंतर जवळ जवळ १ आठवड्याने त्यांना प्रेस घेण्याची गरज का लागली? ते कुणाची वाट बघत होते ? कुणाच्या तरी दबावाखाली त्यांनी भूमिका बदलली आहे, हे प्रश्न उपस्थित केले. प्रकाश पवार हे एका धार्मिक संघटनेचे नेते आहेत. त्यांनीच खोटे बोलावे हे राजकारण्यांनादेखील जमणार नाही. अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे. समोर बसलेल्या समाज बांधवांसमोर त्यांनी ट्रस्ट रद्द करत असल्याची घोषणा केल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.
जाधव म्हणाले, भीम युवा पँथर व समाजाची अशी मागणी होती की, ज्यांनी ट्रस्टमार्फत राजकीय अजेंडा राबविला, त्यांना दूर करा. परंतु हा निर्णय घेणे अध्यक्षांना सोप नसल्याने त्यांनी संपूर्ण ट्रस्टच रद्द करत असल्याचे जाहीर केले. त्यासंबंधीचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते म्हणतायत समाजातील काही लोक संभ्रम निर्माण करतायत. मात्र आमचे ठाम म्हणणे आहे की, ट्रस्टचे पदाधिकारी स्वतः संभ्रमित झाले असून, समाजालादेखील ते संभ्रमित करत आहेत. दि. १२/०१/२०२५ च्या सभेमध्ये त्यांनी जाहीर आश्वासन दिले आहे की, आम्ही समाजाच्या भावनांसोबत आहोत. समाजालाच नव्हे तर आम्हाला देखील थिबा राजा कालीन बुध्दविहाराच्या इथे बौध्दविहारच झाले पाहिजे असे वाटते. जमीन समाजाच्या ताब्यात मिळाली पाहिजे व त्याठिकाणी जर बौध्द विहारासाठी शासकीय निधी मिळत नसेल तर समाज स्वतःच्या हिंमतीवर विहार निर्माण करेल. या भूमिकेशी देखील आम्ही सहमत आहोत. यापुढील कामकाज समाज आणि आम्ही एकत्र मिळून करू. असे जाहीर केले असताना १७ जानेवारी रोजीच्या प्रेसमध्ये कम्युनिटी सेंटर बांधले तरी चालेल, ते बुध्दविहारच आहे, कम्युनिटी सेंटरसाठी काही ठराविक लोकांचा विरोध आहे, असे ते म्हणतायत. वास्तविक ते स्वतः खोटं बोलत आहेत. परंतु समाजाला देखील ते खोट ठरवत आहेत. आणि हे खूपच संतापजनक असल्याचे जाधव म्हणाले.
वास्तविक कम्युनिटी सेंटर आणि बौध्दविहार यामध्ये जमिन आस्मानचा फरक आहे. कम्युनिटी सेंटर म्हणजे समुदाय केंद्र, ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवू शकतात. बौध्दविहार हे (बौध्द अनुयायांचे) बुध्दिष्ठ लोकांसाठीचे संस्कार, धम्म आचरण करण्यासाठीचे प्रार्थना स्थळ आहे आणि थिबा राजाचे बौध्दविहार तर सुमारे १२० वर्षांपूर्वीचे पुरातन प्रार्थना स्थळ आहे. त्याची जपणूक करणे हे तमाम बौध्द अनुयायांचे कर्तव्यच आहे. आणि या जमिनीच्या सातबारावर “थिबा राजा कालीन बुध्दविहारासाठी राखीव जागा अशी नोंद देखील आहे. त्याचबरोबर शासनाने २००९ च्या अगोदरची अनधिकृत प्रार्थनास्थळे नियमित करण्यासाठी २०१७ साली निर्णय घेतला होता. त्यामध्ये “म्यानमारच्या थिबा राजाचे बौध्दविहार स्थळ शासनाने अधिकृत केलेले आहे. असे असताना चॅरिटेबल ट्रस्टला त्याठिकाणी बुध्दविहाराऐवजी कम्युनिटी सेंटर व्हावे असे का वाटते? त्यासाठी एवढा आटापिटा का हा मोठा प्रश्न आहे. कदाचित त्यासाठी मंजूर झालेली ७.५ कोटी रुपये कारणीभूत तर नाही ना.? कारण ट्रस्टमधील काही २-४ लोकांना त्याचे सबकॉन्ट्रक्ट मिळणार असल्याचे समजते. २-४ लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी हे संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार करत आहेत. कारण कम्युनिटी सेंटर बांधण्याची मागणी ट्रस्ट ने ३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या पत्राने नगर परिषदेकडे केलेली आहे, यांचा हेतू प्रामाणिक नसल्यानेच हे एका पुरातन संस्कृतीचे अस्तित्व मिटवायला निघालेले आहेत. ही जमीन मिळण्यासाठी ट्रस्टची स्थापना झालेली होती तर जमीन न मिळविता कम्युनिटी सेंटर बांधण्याचा अटटाहास का? जमीन शासनाची इमारत शासनाची मग ट्रस्टचे काम काय? मग ट्रस्ट कशाला हवी? तालुक्यातील, जिल्ह्यातील बौध्द समाजाला त्याठिकाणी कम्युनिटी सेंटर नको, तर बौध्दविहारच हवे आहे. अशी देखील मागणी यावेळी भीम युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
ट्रस्टच्या वतीने असे सदस्यत्व दिले जात असेल तर ते स्विकारू नये आणि जे कोणी तसे सदस्यत्व स्विकारतील त्यांनी मनाशी खुणगाठ बांधून ठेवावी की तुमच्या आणि समाजाच्या मनातील समाजाच्या मालकीचे बुध्दविहार तुम्ही कायमचे गमावून बसणार आहात आणि म्हणून सर्वसाधारण समाज बांधवानी या ट्रस्टचे सभासद होवून समाजाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये. समाजानेदेखील याचा प्रामाणिक विचार करून थिबा राजाकालीन बौध्दविहार वाचविण्यासाठी आपला सहयोग द्यावा. संपूर्ण बौध्द समाजाला, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांना अध्यक्ष अमोल जाधव यांनी आवाहन केले.



