Uncategorized

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्थांतर्फे २६ जानेवारीला लाक्षणिक उपोषण

पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहासाचा सामावेश

रत्नागिरी : रत्नागिरीतील ऐतहासिक पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तर खरा इतिहास मिटविण्याचे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. याबाबत यापूर्वी दिलेल्या निवेदनावर कोणतीही सुधारणा केली नसल्याने यावर तत्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांच्यामार्फत लाक्षणिक उपोषण केले जाणार असल्याचे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी सांगितले.

याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला मंगळवारी (१४ जानेवारी) देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने इंग्रजी व मराठी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्र. २४ वर वि. दा. सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधले अशा स्वरूपाचा खोटा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. वास्तविक देशातील पहिले प्रतितपावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. तसा शिलालेख १९३१ साली पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारच्या कमानीवर आहे, त्याची छायांकीत प्रत देखील जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनासोबत जोडली आहे.

दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वा. वीर सावरकर यांच्या विनंतीवरून रत्नागिरीत स्वत: जागा खरेदी केली होती. त्यावर स्वखर्चाने पतितपावन मंदिर बांधले आणि स्पृश्य-अस्पृश्यांना एकत्र आणून सहभोजन घडविले. त्याकाळी भारतातील मोठ मोठी संस्थाने देखील अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देवू शकली नव्हती. सन १९३१ मध्ये पतितपावन मंदिराच्या उभारणीपासून दरवर्षी दिवाबत्ती व देखभालीसाठी दीड हजार रुपये भागोजीशेठ स्वत देत असत. पतितपावन मंदिर व मंदिरा शेजारील चाळ बांधण्यासाठी भागोजीशेठ कीर यांनी खासगीतून केलेला खर्च १९३३ सालच्या भागोजी बाळोजी कीर चॅरीटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दर्शविलेला आहे. असे असताना पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत असून खरा इतिहास मिटविण्याचे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे.

या पुस्तकाचे प्रकाशक विवेक उत्तम गोसावी, पाठ्यपुस्तक मंडळ प्रभादेवी, मुंबई २५ हे आहेत. याबाबतचे निवेदन दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे. याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, यासाठी २६ जानेवारी रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांच्यामार्फत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष श्री. कीर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button