मुख्य बातमीशैक्षणिक

तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींच्या निर्माणासाठी करायला हवा. : प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राष्ट्रीय विद्यान दिन साजरा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे. शेजारी प्रा. प्रियंका घोरपडे आणि प्रा. अहलाम खान.

रत्नागिरी : ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी भारताचे भविष्य म्हणून तुमची आहे. त्यादृष्टीने वाटचाल करा आणि विज्ञान क्षेत्राबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन भारताला जगात अग्रेसर बनविण्यासाठी मोलाचा वाटा उचला. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी आणि त्या निर्माण करण्यासाठी करायला हवा.,’ असे आवाहन एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे यांनी केले.
येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (सीएसआयटी) विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्या बोलत होत्या. या वेळी सीएसआयटी विभागातील प्रा. अहलाम खान, प्रा. प्रियंका घोरपडे, प्रा. सुलोचना कुमारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत प्रा. अहलाम खान, प्रा. सुलोचना कुमारी, प्रा. रोहित शेवाळे.

डॉ. जगदाळे म्हणाल्या, ‘विज्ञान आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. आपण नेहमीच म्हणतो, ऐकतो की ओझोनचा थराची पातळी कमी होतेय म्हणून पण केवळ चर्चा करण्यात वेळ घालवतो त्यासाठी आपण काय करतो हा विचार व्हायला हवा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आपल्याला घालून दिलेले नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे.’
या वेळी घेण्यात आलेल्या पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन स्पर्धेत कॉम्प्युटर सायन्समधील क्षितिज विश्वनाथ सावंत, फरहान तालिब मौला आणि मोहम्मद सलाह शकिल शेख यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील वेदान्त नरेंद्र सावंत, अथर्व सुधाकर महाडीक आणि अमान उस्मान कोंडकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अहलाम खान आणि प्रा. प्रियंका घोरपडे यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. जगदाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. रोहित शेवाळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button