मुख्य बातमीराजकीय

माझ्या पराभवाला पक्षातील वरिष्ठ नेतेच जबाबदार : राजन साळवी

"योग्य वेळी योग्य निर्णय घेईन" वक्तव्याने ठाकरे शिवसेनेत मोठी खळबळ

रत्नागिरी : ‘मी नाराज नाही…’ असे म्हणणार्‍या माजी आमदार राजन साळवी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, माझ्या पराभवाला पक्षातीलच हितशत्रू जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. राजन साळवी यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण सामंत यांनी पराभव केला. या पराभवानंतर राजन साळवी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे; मात्र, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर राजन साळवी यांनी गुरुवारी (२ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

‘मी नाराज असल्याच्या चर्चा आहेत; मात्र तसे काही नाही’, असे स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिले होते; मात्र ३ जानेवारी रोजी लांजा येथे राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, असे स्वत: राजन साळवी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावे आणि संवाद साधावा. मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मी देखील सांगितले की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन. तसेच आज लांजा येथील पदाधिकार्‍यांनी मला बोलावले होते. मी या ठिकाणीही आलो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझ्या भावना मी त्यांच्याबरोबर व्यक्त केल्या. यावेळी निश्चितच भविष्यात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईन असे मी त्यांना सांगितले आहे, असे राजन साळवी यांनी स्पष्ट केले.

माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. आज पक्षावर आणि माझ्यावरही दु:खाचा डोंगर आला. यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधणे गरजेचे आहे. जर शोधले नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते; मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेकांनी मला सांगितले की तुम्ही योग्य निर्णय घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असेही साळवी यांनी म्हटले.

ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ च्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button