बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या चिरेखाण मालकाला अटक

रत्नागिरी : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्य सरकारने सक्त पावले उचलली असतानाच आता रत्नागिरीतही पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. १३ बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या तालुक्यातील नाखरे कालकर कोंड येथे चिरेखाणीचा व्यवसाय करणारा पावस भुसारवाडा येथील खाणमालक आसिफ कासम सावकार (५६) यांना पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.
त्यांच्यावर विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी रात्री उशिरा ही कारवाई केली.
या खाण मालकाने १३ बांग्लादेशी घुसखोरांना जून २०२४ पासून ११ नोव्हेंबरपर्यंत ते बांग्लादेशी नागरिक असल्याचे माहिती असूनही आपल्या खाणीवर कामासाठी ठेवले होते. या घूसखोर कामगारांनी कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत बांग्लादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या सर्व कामगारांना अटक केली होती. परंतू खाण मालक आसिफ सावकार हा मुंबईत उपचारांसाठी गेला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे स्वतः करत आहेत. या गुन्ह्यातील १३ बांग्लादेशी कामगार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.



