अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांचे निधन
वयाच्या १००व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांचे निधन झाले आहे. ते १०० वर्षांचे होते. त्यांनी अमेरिकेचे 39वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले होते. १९७७ ते १९८१ दरम्यान ते राष्ट्रपतीपदावर कार्यरत होते. राष्ट्रपतीपदावर असताना त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची मोठी प्रशंसा झाली होती. त्यांना २००२ साली नोबेल शांती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
जिमी कार्टर यांचा जन्म जॉर्जियातील प्लेन्स येथे झाला. राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचण्याआधी ते जॉर्जियाचे गव्हर्नर होते. ते १९७१ ते १९७५ या दरम्यान जॉर्जियाचे गव्हर्नर होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या प्रचारात त्यांची वक्तव्य चांगलीच गाजली होती. ‘मी तुमच्याशी खोटे बोललो अथवा दिशाभूल करणारी विधाने केली, तर मला मत देऊ नका’, हे त्यांचे वक्तव्य चर्चेत आले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती जेराल्ड फोर्ड यांचा पराभव केला होता.
त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२४ ला प्लेन्स येथे झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा १००व्या वाढदिवसानिमित्ताचा फोटो समोर आला होता. त्यांचे वडील शेतकरी होती. त्यांनी अमेरिकेच्या नौदल अकादमीमध्ये अणुविज्ञानाचा अभ्यास केला आणि १९४६ मध्ये पदवी प्राप्त केली.
पदावर असताना मध्यपूर्वेतील देशांमध्ये शांतता प्रस्तावित करण्यासाठी त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यांनी १९७८ मध्ये त्यांनी ऐतिहासिक कॅम्प डेव्हिड कराराच्या अंमलबाजवणीसाठी मध्यस्थी केली होती. इस्त्रायल आणि इजिप्तमध्ये शांतता करारासाठी त्यांची प्रमूख भूमिका होती. आंतरराष्ट्रीय शांतता, लोकशाही आणि मानवाधिकार यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.



