रामदास कदम यांच्या आक्षेपार्य विधानामुळे गुहागरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
प्रचार थांबवला : डॉ. विनय नातू यांची जाहीर माफीची मागणी

गुहागर : ऐन निवडणुकीच्या काळात गुहागरमध्ये महायुतीत पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना नजरकैदेत ठेवावे अन्यथा मनोरुग्णालयात पाठवावे, अशी मागणी गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
शिवसेनेचे नेते माजी आमदार रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबद्दल मंगळवारी (१२ नोव्हेंबर) केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. मतदानाला आठ दिवस असताना गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
रामदास कदम यांनी तात्काळ डॉ. विनय नातू आणि भाजपची माफी मागावी अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ असा इशारा देतानाच याचे पडसाद गुहागरसह दापोली मतदारसंघातही उमटणार असून निवडणुकीचा निकाल विपरीत लागल्यास त्याला गुहागर भाजपला जबाबदार धरू नये, असे विधानही गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी केले.
विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेले आम्ही सहन करणार नाही, असे श्री. सुर्वे यांनी सांगितले. रामदास कदम आणि भास्कर जाधव यांची मिलीभगत असल्याचा तसेच दापोलीतून योगेश कदम, तर गुहागरमधून रामदास कदम यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम याला उमेदवारी देण्यासाठी रामदास कदम यांचा डाव असल्याचा आरोपही यावेळी श्री. सुर्वे यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर निकाल विपरीत आल्यास भाजपाला जबाबदार धरू नये, असेही तालुकाध्यक्ष श्री. सुर्वे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित होते.



