मुख्य बातमी

हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या हस्ते गाण्याचे पोस्टर लाँच

लांजा : कोकणचे पारसमनी अभिनेता प्रभाकर मोरे यांच्या हस्ते ‘गावं जावडे बापेरे रावारी लांज्याची शान हाय र…’ या गाण्याचे पोस्टर लाँच झाले आणि ‘कोकण टॉकीज’ या यु-ट्यूब चॅनलवर अभिमान गीत प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याच्या पोस्टर लाँच करण्यासाठी अनेक कलाकार उपस्थित होती. या गाण्यात अभिनेता किशोर साळुंखे, अभिनेता कोकणी निखिल सकपाळ, अभिनेत्री सिद्धी सांडये, वैष्णवी सुर्वे यांच्यासोबत जावडे, बापेरे, रावारी या तिन्ही गावातील कलाकारही सहभागी होते. या गाण्याचे दिग्दर्शन सुयोग हांदे यांनी केले आहे. चित्रीकरण देव सावंत आणि ड्रोन कॅमरा सुपर सुबोध यांचे असून, नृत्य दिग्दर्शन रुपेश गोरवे यांनी केले आहे.

या गाण्याचे संगीत पंकज काताळे आणि पंकज घाणेकर यांनी केले असून कोकणची परंपरा जपणारे शाहीर राजेश निकम आणि शाहीर देवेंद्र झिमण, गायिका रसिका तांबे यांच्या सुमधुर आवाजात गाणे गायले आहे. जावडे, रावारी, बापेरे या गावांच्या ग्रामीण व मुंबईच्या ग्रामस्थांनी या गाण्याला विशेष सहकार्य केले आहे. याकामी कलारंग प्रोडक्शनचे  सहकार्य लाभले.

या गाण्याच्या संकल्पनेविषयी गाण्याचे प्रमुख किशोर साळुंखे यांनी सांगितले की, हल्ली अनेकजण आपापल्या गावावर गाणे काढतात. म्हणून मग आपणही आपल्या गावावर एखादे गाणे तयार करू, अशी गेल्या दोन वर्षांपासून गावातील मुलांची इच्छा होती. मी माझ्या कामात असल्याने लक्ष दिले नव्हते; परंतु तिन्ही गावातील तरुण मंडळींनी गाण्यासाठी सतत पाठपुरावा केला. गावातील निसर्ग सौंदर्य, परंपरा, जनजीवन जगासमोर यायला हवे यासाठी हा अट्टाहास होता. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी त्यांनी मला सर्व प्रकारचे सहकार्य केले आणि गाणे तयार झाले. हे अभिमान गीत तीन गावांचे मिळून केले गेले आहे. हे गाणे करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे माझे गावचे घर जावडे-बापेरे-रावारी या तिन्ही गावांच्या सीमेवर आहे. म्हणूनच माझ्यासाठी ही तिन्ही गावे म्हणजे एकच गाव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button