अशा लाल मातीतराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

ठाकरे नावाचं वादळ घोंगावतय!

 – अभिजीत हेगशेट्ये

अत्यंत अनपेक्षित राजकीय वादळांचे आक्रमण आणि त्या सोसाट्याच्या वावटळीत पार घुसळून निघणारा राजकीय आसमंत हे जणू कोकणचे वैशिष्ठ्यच मानले जाते. अरबी समुद्रवरून येणाऱ्या तुफानी वादळी पावसासारखी ही राजकीय वादळे अनपेक्षितपणे कोकणच्या किनाऱ्यावर घोंगावत येतात आणि वेगळेच निकष आणि तुफान माजवत परिवर्तनाची साद साऱ्या महाराष्ट्रालाच जणू घालत असतात असाच या मातीचा गंध आणि रंग ही!

नुकतेच काल परवापर्यंत आरएसएसच्या करड्या आणि कडव्या शिस्तीत असणारे, गेली ३५ वर्ष एकनिष्ठेने संघाचे आणि भाजपचे हार्डकोअर नेते एका सायंकाळी हाती शिवबंधन बांधत थेट महायुतीच्या विरोधात असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात आणि मातोश्रीवरून (एबी फॅार्म) रत्नागिरी विधानसभेची उमेदवारी घेऊनच रत्नागिरीत उतरतात. पाठोपाठ विधानसभेच्या महासंग्रामातील कोकणच्या धगधगत्या अंगाराची पहिली मशाल पेटविण्यासाठी शिवसेनाप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे हे रत्नागिरी येथे विराट सभा घेत रत्नागिरीकरांना शिवसेनेचा हा वाघ देत आहे, आता गद्दारांना हद्दपार करत परिवर्तनाची ही वेळ आहे, असे आवाहन करत कोकणच्या सर्वच विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची धगधगती मशाल पेटवित ठेवण्याचे भावनोत्कट आवाहन करतात. विधानसभा निवडणुकीच्या अगदी पहिल्याच आठवड्यात नव्या प्रवेश आणि नव्या उमेदवारीचे हे तुफान कोणते वादळ उठविणार! हा प्रश्न राजकीय पटलावर अत्यंत चर्चेचा आणि समिक्षकांना आकडेमोडीसाठी चालना देणारा आहे. आजवर सहज, सोपी, एकहाती, प्रस्थापितांना आवाहनच नसणारी रत्नागिरी विधानसभेची निवडणूक अचानक कांटे की टक्करच्या प्रवासाकडे निघाली….

विधानसभेच्या निमित्ताने अशा वादळांचा इतिहास रत्नागिरी जिल्ह्यासाठी फार मोठा रोचक आणि तितकाच राजकीय व्यूहरचनेतील डावपेच टाकणारा आहे. त्यांने भल्या भल्या प्रस्थापितांना चारी मुंड्या चीत करत नवा इतिहास रचला आहे. कोकण हा सदैव प्रस्थापितांविरोधात लढणारा प्रांत. कोणाला निवडून आणण्यापेक्षा कोणाला पाडण्यात सर्वाधिक आनंद अनुभवणारी मानसिकता याचा फटका माजी केंद्रीय रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांनाही बसला, या भूतलावरील चमत्कार म्हणून संभावना होणारी कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाल्यावर कोकणवासीयांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संपूर्ण देशात आणि राज्यात काँगेस राज होते; मात्र १९६६ साली शामराव पेजे यांनी जिल्ह्यातील बहुमत असणाऱ्या कुणबी समाजाची अस्मिता जागविली. आपल्या बहुमताचा प्रतिनिधी विधानसभा लोकसभेत गेला पाहिजे, याची मांडणी गावागावात वाड्यावाड्यात फिरून केली. या जाणीव जागृतीतूनच लक्ष्मणराव हातणकर, शामराव पेजे, लक्ष्मीबाई भुवड, गंगाराम सकपाळ, तु. बा. कदम, रामचंद्र बेंडल, शिवाजीराव जड्यार ही कुणबी नेतृत्व थेट विधानसभेच्या निर्णय प्रक्रियेत गेली. या कुणबी समाज आंदोलनाचा प्रभाव इतका होता की जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शामराव पेजे आणि या मतदारसंघातील खासदारकी यांच्याकडे होती. कुसुमताई अभयंकर यांच्यानंतर कोण, हा विचार करताना भाजपसारख्या अभिजनांच्या पक्षाने शिवाजीराव गोताड या कुणबी शिक्षकाला उमेदवारी द्यावी लागली. शामराव पेजे यांच्या तुफानाने सारा जिल्हा व्यापला होता.

१९९० मध्ये कोकणात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तुफानाने जोरदार मुसंडी मारली. चेंबुरचे नगरसेवक असणारे अत्यंत आक्रमक युवक नारायण राणे यांना सिंधुदुर्गात उतरविले. त्यांनी समाजवादी आणि काँग्रेसची वर्षानुवर्षाची पारंपरिक मतपेढी पार उध्वस्त करत दे…दणा ऽऽऽ दण उडवली. त्यांच्या या आक्रमक शैलीचा पैलू कोकणी तरुणाला आकर्षित करणारा ठरला. रत्नागिरी जिल्ह्यात येथील मतदारसंघ, तालुके, गावे यांना फारसे परिचित नसणारे मात्र मुळ गाव असणारे आणि मुबंईत शिवसेनेच्या आणि महानगरपालिकेच्या राजकारणात स्थिरावलेले आर्थिक सक्षम असणारे, प्रसंगी जोरदार राडेबाजी करू शकणारे शिलेदार कोकणातील विधानसभा मतदारसघांत पाठविले. त्यात खेडमधून रामदास कदम, दापोलीत सुर्यकांत दळवी, चिपळूणमधून बापू खेडेकर, तर देवरुख-संगमेश्वर येथील स्थानिक धडपड्या कार्यकर्ता रवींद्र माने या नव्या चेहऱ्यांना संधी देत हेच ते शिवसेनेचे खरे ढाण्या वाघ असे बाळासाहेबांनी सांगितले आणि काय चमत्कार… साऱ्या कोकणवर भगवे तुफान आले आणि हे सारे शिलेदार पहिल्याच फटक्यात निवडून आले. प्रस्थापितांना नक्की राजकारणात कोणते वादळ आले आणि आपल्याला सपाटून गेले हेच समजले नाही. हाच प्रयोग बाळासाहेब साऱ्या महाराष्ट्रात आणि कोकणात पुन्हा पुन्हा करत राहिले.

बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा हीच त्याकाळात कोकणवासीयांचे श्रध्दास्थळ आणि विचारधन होते. कोकणातील प्रत्येक खेड्यापाड्यात शिवसेनेच्या शाखा आणि तेथे सर्वस्व अर्पण करत अत्यंत समर्पणवृत्तीने आणि निरपेक्ष भावनेने काम करणारा शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद कोकणच्या दऱ्या-खोऱ्यात छत्रपती शिवरायांचा वारसा घेत दुमदुमत राहिली. याची ताकद किती अपरंपार होती त्याचा प्रत्यय त्यानंतर ज्यावेळी चिपळूण येथे उमेदवार बदलून भास्कर जाधव यांना शिवसेनेने तिकीट दिले. राजापूर मतदारसंघात रत्नागिरी येथील विजयराव (आप्पा) साळवी यांना पाठवले. त्यांनतर गणपत कदम, राजन साळवी यांना पाठवले, ह्या बदलत्या उमेदवारांबद्दल अनेकवेळा नाराजी आली; मात्र शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता फक्त सेनाप्रमुखांच्या आदेशालाच बांधलेला राहिला आणि त्यांनी जीवाचे नाव शिवा करत या प्रत्येक उमेदवाराला निवडून दिले.

अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मंत्री उदय सामंत हे तर २०१४ च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अचानक मातोश्रीवर गेले. तेथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. शिवसेनेच्या जिल्हा वर्तुळात जणू गहजब उडाला. भाजपच्या आमदारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फारमोठी सभा घेतली; मात्र कट्टर शिवसैनिकांचा कडवेपणा हटला नाही. मातोश्रीवरील शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेबांचा आदेश त्यांनी शिरसावंद्य मानत सामंत यांना भरघोस मतांनी निवडून दिले. हा करिश्मा या कडव्या शिवसैनिकांचा कोकणच्या लाल मातीत अणूरेणूत रुतलेला आणि रुजलेला. या पार्श्वभूमीवर नवे वादळ थेट मातोश्रीच प्रत्यक्ष येथे घेऊन आली आहे. या तुफानाचा तडाखा कोणते परिवर्तन घेऊन येत आहे, हा या निवडणुकीतील उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button