खड्यातच आनंद शोधणारे आम्ही रत्नांगिरीकर…

डांबर आणि रस्ते हा रत्नागिरीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि रोजच्या त्रस्थ जीवनातील कळीचा प्रश्न आहे. रत्नागिरी शहरातील विकास हा डांबरीकरण आणि रस्ते ह्यांच्याशी जोडला गेला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत दोन पिढ्या जन्माला आल्या. त्यातील एक पिढी तर आज विशीच्या पुढे गेली. कोणी प्राध्यापक, शिक्षक , व्यापारी, डॉक्टर, इंजिनिअर झाले. अनेक कॅान्ट्रक्टर झाले, कोणी पत्रकार झाले. काहींनी जन्मापासून तर काहींनी वयाच्या ४-५ वर्षांपासून या दर्दभऱ्या खड्डेमय रस्त्यातूनच आपल्या बालपणीच्या आठवणी जपल्या. रस्ते, डांबर आणि खड्डे हा त्यांच्या जीवनातील एक रुटीनचा भाग झाला.
प्रचंड खड्डे असणारे, गुळगुळीत डांबर टाकलेले, उन्हात ती डांबर वितळून पायाला चटका देणारे, त्यातील रॅाकेलच्या बेसुमार पाणीदारपणाने उन्हात सदैव चमकणारे, मात्र पहिल्याच पावसात स्वतःवरील डांबरीचे आवरण फेकून देत खड्यांचा रुद्रावतार धारण करत अनेक गाड्यांना आणि त्यावरील माणसांना हाडेमोड मोहीम राबवत काहींना तर थेट यमसदानस धाडणारे. हे रस्ते आणि त्यावरील खड्डे त्यामुळे होणारे अपघात, मोडणारे हातपाय आणि अनेकवेळा होणारे मृत्यू हे जणू आपले प्राक्तनच आहे, अशीच मानसिकता गेल्या दोन दशकांत रत्नागिरीकरांची झाली आहे. त्यामुळे खड्डे विना रस्ते ही संकल्पानच त्यांना अस्वस्थ करणारी वाटते. या खड्यांच्या रसभरीत चर्चा त्यावरील मोठ मोठी विविध आकाराच्या अस्तरांनी निर्मिलेले नकाशे हे जणू साऱ्या पृथ्वीतलावावरील विविध प्रदेशांचे प्रारुपच या भूमीवर उतरल्याचा मोठा अभिमान रत्नागिरीकर सदैव सांगत असतात. यात एक दिवस पाय घसरुन पडाल अश्या गुळगुळीत रस्त्यांच्या राजकीय घोषणेने तर रत्नागिरीकरांना वर्ल्डकप जिंकल्याला आनंद होतो आणि तो तेवढ्यात ताकदीने सावरकर नाट्यगृहात शाश्वत संकल्पनेचा आविष्कार म्हणून साजरा करण्यात रत्नागिरीकर कोठेच कमी पडत नाही.
रत्नागिरीकरांच्या या खड्डेमय रस्ता प्रेमाला अनेकवेळा काही ब्लॅाग रायटर, आपवाले, आरटीआय, सोकॅाल्ड कार्यकर्ते नाहक बदनाम करण्याची मोहीम राबवितात. त्यात ते येथे वापरली जाणारी डांबर कमी दर्जाची असल्याचा आरोप करतात. काही वेळा तर या डांबरीत डांबरी पेक्षा रॅाकेल मिश्रण जास्त असल्याचे खोटे आरोप करण्यासही ते कचरत नाहीत. काहींनी तर कमालच केली होती, म्हणे डांबरीचे बोझर मध्येच हडप केले जातात. एकाच बोझरवर १०-१० रिसीट मारल्या जातात. न केलेल्या कामांची कोट्यावधींची बिले होतात. डांबर टाकण्याचे प्रमाण फक्त २०-२५ टक्केच. म्हणजे १० लाखांच्या कामात खर्च फक्त दोन लाखच करून आठ लाख हडप करतात. असे भीषण आरोपांचे सत्र सुरू असते; मात्र असल्या भंपक आरोपांना येथील वृत्तपत्र जराही थारा देत नाही. तर थेट थेकेदार किती मोठे आणि रत्ननगरीच्या विकासातील त्यांचे अभूतपुर्त्त योगदान किती महत्त्वाचे याचे रसभरीत वर्णन करत पुरवण्यावर पुरवण्या प्रसिद्ध करून खऱ्या अर्थाने जनतेच्या मन की बात सांगतात आणि लोकांना तेच आवडते.
येथील काही टिनपाट पुढारी, टीनपाट एवढ्यासाठी की त्यांच्यामागे एक कार्यकर्ता नाही ते निघतात या रस्त्यातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करावयाला. त्यातील काही महिला कार्यकर्त्या तर फारच आक्रमक टीका करतात. एकदा तर त्यांनी भर पावसात नगरपालिकेवर मोर्चा काढला. बिचारे मुख्याधिकारी त्यांच्या तावडीत सापडले. या महिलांनी म्हणे त्यांना जोड्याचा हारच घातला आणि यथेच्च शाब्दिक धुलाई केली. अखेर तो हैराण होऊन म्हणाला, “मी काय सांगू बहेनजी… माझ्या वाटणीला एक टक्काही येत नाही. मला तेवढीच दुषणे द्या! येथे ९० टक्के खाणारी टोळकी रत्नागिरीकरांनीच डोक्यावर चढवून ठेवली आहेत यांत माझा काय दोष.” अर्थात या त्यांच्या विपर्यस्त बोलण्याची कोणी दखल घेतली नाही तेच बरं झाल; मात्र रत्नागिरीकर फार हुशार आहेत. लोकमान्य टिळक, सावरकर, चिपळूणकर, आगरकर यांचे संस्कार आहेत त्यांच्यावर ते काही असे भलत्या सलत्या टीकेची दखल थोडीच घेणार. ते नेहमीच विकासासोबत आहेत.
तसे आज काल रत्नागिरीत डॅाक्टर्स आणि ॲम्ब्यूलन्स यांचा धंदा फार तेजीत आहे. शहर म्हणे वेगाने वाढत आहे. भले लोकसंख्या वाढत नसली तरी येथील या खड्डेमय चित्तथरारक रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रत्नागिरी शहरातील १०-१२ किलोमीटरच्या मार्गावर रोज किमान २०-२५ अपघात होतातच. त्यात अनेकांचे हात पाय मोडणे, डोक्याला मार लागणे असे प्रकार होत असल्याने आर्थो, फिजिशीअन, सर्जन, साऱ्यांचीच मागणी वाढली आहे. ओपीडीवर चालणारे दवाखाने आता आयपीडी हॅास्पिटल करू लागली आहेत. सोबत मेडिकल स्टोअर्स, टपऱ्या यांचा धंदा वाढतो आहे. तरुणाला काम मिळत आहे आणि रस्ते डांबरीकरण करणे हा रत्नागिरीच्या विकासाचा खऱ्या अर्थाने महाविकास मार्ग आहे. ठेकरेदार नावाची अद्यवयावत लाइफ स्टाईल हे रत्ननगरीचे भूषण ठरत आहे. “बांधा – तोडा – पुन्हा बांधा” या तत्वावर एकाच रस्त्यावरील कामे पुन:पुन्हा केली जात आहेत. पुनः पुन्हा तीच टेंडर हे त्यातील विषेश वैशिठ्य आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर महामंदीच्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी धरणे आणि रस्ते बांधणीची प्रचंड कामे काढून रोजगार निर्मिती करत आर्थिक विकासाला चालना दिली होती. असा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार रत्ननगरी करत आहे. रत्नागिरीकर या विकास प्रक्रियेवर फार खुष आहेत. या विकासात आपला महाविकास शोधत आहेत. उद्या महाराष्ट्रात हा महाविकास पर्वाचा फॉर्म्युला आदर्श फॉर्म्युला होऊ शकतो. पुन्हा येणारी प्रत्येक निवडणूक म्हणजे जणू रत्नागिरीकरांना दिवाळी, दसरा सणच वाटत आहे;
मात्र या आदर्श लोकाभिमुख महाविकास फॉर्म्युलाला काही नतद्रष्ट नखे लावण्याचा अघोरी प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न गल्लीतल्या कोपऱ्यात होते तोपर्यंत ठीक होते. आता थेट ते विधानसभेत गेले आहेत. विधानसभेत रत्नागिरीतील डांबर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि रत्नागिरीकर अत्यंत संतप्त झाले.
आजपर्यंत रत्नागिरी येथील हापुस आंब्यासाठी प्रसिद्ध होती. तो कापून खातात की चोखून खातात हा प्रश्न अक्षय कुमारने तर आंतरराष्ट्रीय केला; मात्र आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी रत्नागिरीच्या डांबरप्रकरणी कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा थेट आरोप आणि चर्चा विधानसभेत उपस्थित करून रत्नागिरीकरांच्या अस्मितेलाच ठेच दिली आहे. ह्या पावसाळ्यात सिमेंट आणि डांबर यामुळे रस्ते अधिक खड्डेमय झाले, अपघातांचे प्रमाण वाढले; परंतु आम्ही रत्नागिरीकर कोठे नाराज होतो. आम्ही तर या खड्यातच आमचा स्वर्ग शोधत आहोत; मात्र आता विधानसभेच्या पटलावर गेल्याने आम्ही या खड्डेमय आनंदाला मुकणार तर नाही ना अशी शंका नाक्या नाक्यावर रत्ननगरीकरांना अस्वस्थ करत आहे.


