मुख्य बातमीशैक्षणिक

नवीन शिक्षण धोरणाचे सकारात्मक परिणाम : नंदकुमार साळवी 

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ केजी टू पीजी या दिशेने काम करत आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल करत आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि प्रगतीची नवी दिशा मिळेल. येत्या काही वर्षांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असे प्रतिपादन भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमधील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे ३३ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवली. जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी आमच्या शाळेचे आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, श्रीराम भावे, विनायक हातखंबकर, शिष्यवृत्तीप्रमुख सौ. ताडे, अजित मुळीक, सुनील वणजु आदी उपस्थित होते.

श्री. साळवी म्हणाले की, शिष्यवृत्ती परीक्षेत गेली कित्येक वर्षे पटवर्धन हायस्कूलने उज्ज्वल परंपरा राखली आहे. गेल्या वीस वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेतून ३५० पेक्षा जास्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निवडले गेले आहेत. आमची संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिर, पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे विशेष नाव कमावले आहे. या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. दहावीचा निकाल ९९.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ८० टक्के विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत गुण मिळवले आहेत. बारावी कला शाखा निकाल ८९.८३ टक्के, बारावी विज्ञान १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कॉमर्सचा निकाल ९८.४७ टक्के लागला. वरिष्ठ महाविद्यालय देखील आपल्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. विविध विद्याशाखांमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

भारत शिक्षण मंडळाच्या प्रगतीच्या मार्गावरील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे नवीन वास्तूच्या बांधकामाची सुरवात. तब्बल ३३ हजार चौरस फुटांची ही इमारत सात कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये अद्ययावत सुविधा आणि संसाधनांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षणाची संधी मिळेल. भारत शिक्षण मंडळाने आपल्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे विद्यार्थ्यांना नवा मार्ग दाखवला आहे. या प्रगतीमुळे रत्नागिरीतील शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे, असा विश्वास नंदकुमार साळवी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button