जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम ) विशेष शोध मोहिम होणार कु

रत्नागिरी : सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे ध्येय्य साध्य करण्यासाठी समाजातील जोखीमग्रस्त भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात १६ ते २० डिसेंबर या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जोखीमग्रस्त भागातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य सेवकांना तपासणी करू द्यावी व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे व मोहिमेमध्ये कुष्ठरोगाचे निदान झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.
कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम सन २०२४-२५ च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या सूचनेनुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात काल (ता. १२) जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार, तसेच जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सायली नाईक, जिल्हा लेखा व्यवस्थापक लता गुंजावटे व आरोग्य विभागाचे सबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत १६ ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात चिरेखाण कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरीत व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यांसारख्या जोखीमग्रस्त भागातील सर्व नागरिकांची तपासणी झाली पाहिजे व आरोग्य विभागामार्फत या मोहिमेचे प्रभावीपणे पर्यवेक्षण व्हावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिल्या.
समाजातील नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. यासाठी या मोहिमेत १६ डिसेंबरपासून जिल्ह्यात चिरेखाण कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरीत व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी अशा जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येऊन प्रत्यक्ष शारीरीक तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी दिली.
नागरिकांनी फिक्कट लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखऱ्या मज्जातंतु, हाता-पायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे आदी लक्षणे दिसल्यास या मोहिमेत तपासणीसाठी घरी येणाऱ्या स्वयंसेवकाकडून तपासणी करून घ्यावी. तसेच संशयित रुग्णांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.



