मतदानासाठी रत्नागिरी पोलीस यंत्रणा सज्ज : जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
विविध मतदान केंद्रांवर रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजारच्या वर पोलीस कर्मचारी तैनात

रत्नागिरी : उद्या (२० नोव्हेंबर) होत असलेल्या विधानसभेच्या मतदानासाठी जिल्हा पोलीस दलाने आपली यंत्रणा कार्यरत केली असून संपूर्ण जिल्ह्यात २ हजार २०४ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला १ हजार ६०० होमगार्ड, ६ पोलीस कंपनी यात चार केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा (सीएपीएफ) आणि दोन राज्य पोलीस दलाच्या तुकड्यांचा (एसआरपीएफ) समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
उद्या असलेल्या मतदानासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वांना भयमुक्त वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील आहे. त्यासाठी जिल्हाभरात हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२३ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पोलिसांमार्फत गस्त घालण्यात येत असून, त्यासाठी ७८ सेक्टर तयार करण्यात आले. आंतरजिल्हा चेक पोस्टवर देखील वाहनांची कसून तपासणी चालू आहे. जिल्हा सायबर पोलीस ठाण्यामार्फत सोशल मीडिया माध्यमांवर होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जमाव नियंत्रण, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २ ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार आहे.
दृष्टीक्षेपात पोलीस बंदोबस्त योजना
* पोलीस अधिकारी- १२३
* रत्नागिरी जिल्हा पोलीस अंमलदार – १३५४
* रत्नागिरी जिल्ह्याबाहेरील पोलीस अंमलदार – १०५०
* होम गार्ड – १६००
* सीआरपीएफ – (Central Armed Forces) – ४ COY
* एसआरपीएफ (SRPF) – २ COY
* एसएसटी (Static Surveillance) – २१
* एसएसटी (Flying Squad) – १५
* एकूण बूथ – १७४७



