राजापूरची राजकीय वखार कोणाची?

– अभिजीत हेगशेट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिमान, वैचारिक अस्मिता आणि शौर्याचे प्रतीक म्हणून इतिहासात राजापूर वखारीची नोंद आहे. १६६०च्या पन्हाळ्याच्या वेढ्यात इंग्रजांनी गद्दारी करत मोगलांना तोफा पुरविल्या. याचा (रिव्हेन्ज) पुरेपुर वचपा छत्रपतींनी १९६१मध्ये राजापूर येथील ब्रिटिशांच्या वखारीवर हल्ला चढवू ती पूर्णतः लूटून नेत घेतला. अगदी सुरतेच्या लूटीप्रमाणेच याची इतिहासात महत्त्वाची नोंद आहे. हिच वैचारिक अस्मिता राजापूरने बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सहदेव ठाकरे, लक्ष्मणराव हातणकर, भिकाजीराव चव्हाण, हुस्नबानू खलपे यांच्या निवडणुकांतून जपली आणि धगधगती ठेवल्याचा इतिहास आहे.
आज राजापूर विधानसभा मतदारसंघात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अस्मितेचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरत आहे. येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी हे बाळासाहेबांचा अत्यंत निष्ठावान कडवा सैनिक पुन्हा विधानसभा निवडणूक लढत आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत प्रबळ राजकीय आणि धनवान शक्ती असणारे किरण (भैया) सामंत समोर उभे आहेत. जोडीला काँग्रेसचे परंतु आता अपक्ष म्हणून अविनाश लाड बहुजन कुणबी मतांच्या साथीने उभे आहेत. या तिरंगी लढतीचा सामना मोठा रंजक आहे.
समाजवादी जनता पक्ष आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मदारसंघ १९९५मध्ये विजयराव साळवी यांनी काबीज केला आणि नंतर तो शिवसेनेचाच राहिला. लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील साखरपा विभाग असा तीन तालुक्यांत पसरलेला हा विधानसभा मतदारसंघ एका बाजूला जैतापूरचा समुद्र किनारा पादाक्रांत करतो, तर त्याचवेळी सह्याद्रीच्या आंबाघाटाची वेस ओलांडतो. रत्नागिरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजन साळवी २००९ पासून या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक घराघरात संपर्क हे राजन साळवी यांचे वैशिष्ठ्य आहे. सत्तेच्या स्पर्धेत त्यांना संधी मिळू शकली नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून विशेष निधी आणि प्रकल्प आणणे त्यांना शक्य झाले नाही; मात्र येथील जनतेच्या प्रत्येक प्रश्नाशी ते थेट जोडले गेलेले आहेत. विशेषतः नाणार आणि बारसू प्रकल्पातील प्रदूषण प्रश्नावर होणाऱ्या नियोजित प्रकल्प आंदोलनात ते जनतेच्या मतांसोबत राहत त्यांनी आपला जनाधार टिकवून ठेवला आहे.
या निवडणुकीत शिंदे शिवसेनेकडून किरण सामंत हे अत्यंत तगडे उमेदवार मानले जातात. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ते थोरले बंधू अशी त्यांची ओळख आहे; मात्र त्याहीपेक्षा स्वतंत्र उद्योजक आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांनी आपली ओळख थेट मंत्रालय ते दिल्लीपर्यंत अधोरेखीत केली आहे. उदय सांमत यांच्या प्रचाराची धुरा तेच सांभाळत होते. मंत्री म्हणून त्यांच्या कामाच्या महत्त्वाच्या भागाची जबाबदारीही ते सांभाळत. मंत्रालयातील त्यांचा वावर आणि शब्दाला असणारा मान मोठा आहे. मंत्रालयातील बहुतांश खाती तेथील मंत्री त्यांचे पीए त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आवश्यक संपर्क यात ते अत्यंत वाकबगार मानले जातात. आज त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक खात्यावर करारी प्रभाव आहे. त्यामुळेच किरण सामंत यांच्याकडे कोणी काही काम घेऊन आल्यास त्याला सकारात्मक प्रतिदसाद मिळणारच हा त्यांच्याबद्दल असणारा विश्वास मोठा आहे. कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचा मुख्य उद्योग. याचा राजकीय वलय वाढविण्यासाठी त्यांनी अत्यंत उत्तमप्रकारे उपयोग केला आहे. राज्यातील राजकारणासाठी एक नवा कॉन्ट्रॅक्टर सहकार फॉर्म्युला त्यांनी तयार केला आहे. आज संपूर्ण कोकणातील कॉन्ट्रॅक्टर ही त्यांची मोठी शक्ती आहे. राजापूर लोकसभा मतदारसंघासाठी ते प्रमुख दावेदार होते. अखेर केंद्रीय नेते अमित शहा यांना त्यांची समजूत काढावी लागली. मागील दोन तीन वर्षांपासून त्यांनी राजापूर मतदारसंघातील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
या निवडणुकीनिमित्ताने सामंत कुटुंबियच निवडणूक प्रचारात उतरले आहे. किरण सामंत यांची पत्नी, मुलगी, आई, वडील सारेच प्रचारात आहेत. विशेषतः किरण सामंत यांची मुलगी अपूर्वा हीने हा मतदारसंघ पिंजून काढताना राजकीय क्षेत्रातील तिच्या प्रवेशाची नांदी दिली आहे. किरण सामंत प्रथमच या मतदारसंघातून निवडणूक लढवित असले, तरी त्यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या सहकाऱ्यांसोबत जोडत मोठा माहोल तयार केला आहे. कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबतच व्यापारी मंडळींचा पाठींबा त्यांना मिळाला आहे. आर्थिक गणितात सांमत यांचा कोणीच हात धरू शकणार नाही. येथील जुनी समाजवादी मंडळी त्यांची साथ करत आहेत.
या मतदारसंघात अविनाश लाड किती मते घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचा प्रभाव कुणबी मतांवर आहे. काँग्रेसने त्यांना पक्षातून घालवले असले, तरी त्यांचा संपर्क आणि प्रभाव लक्षणीय आहे. येथील आणखी महत्त्वाचा घटक आहेत ते म्हणजे ग्लोबल कोकणचे संजय यादवराव. कोकण विकासासाठी येथील आंबा, काजू उत्पाकांच्या प्रश्नांसाठी आपण उभे राहत असल्याचे त्यांनी सांगतिले. त्यांना हिंदू महासभेने पाठींबा दिला आहे. तसेच नारायण राणे यांचा त्यांना मोठा पाठींबा असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे राणेंच्या सामंत विरोधी भूमिकेचा पडसाद हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
नाणार आणि त्यांनतर बारसू रिफायनरी प्रकल्प आणि त्या विरोधातील जनआंदोलन हा या परिसरातील धगधगता प्रश्न आहे. या प्रश्नांवर राजकीय पक्षांनी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. केंद्र सरकारला हा प्रकल्प येथे राबवायचाच आहे; मात्र या निवडणुकीत प्रकल्प समर्थक गटात असणारे किरण सामंत यांनी आपल्या प्रकल्पाबाबतची भूमिका जनतेसोबत असल्याची घेत प्रदूषणमुक्त प्रकल्प आणण्याचे जाहीर केले आहे. प्रकल्प आंदोलनाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही येथील मतदार मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आणण्याची साधनांची उपलब्धता हा मोठा प्रश्न असतो. आज राजापूर निवडणूक म्हणजे एका बाजूला अफाट संपत्तीची उधळण, तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचा माहोल अशी आहे. अशा वातावरणात मतदार कोणाला निवडतात, तसेच मुंबईतील चाकरमान्यांचा कल काय? हा फॅक्टर महत्त्वाचा आहे.


