भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याची वेदना आणि सांगावा

सन्माननीय बाबासाहेब परुळेकर आणि सन्माननीय दीपक जी पटवर्धन,
आपल्या दोघांविषयी एक भाजपचा एकनिष्ठ आणि सामान्य मतदार म्हणून माझ्या मनात नितांत आदर आहे. गेले काही दिवस आपण दोघे ही महायुती म्हणून सामंत यांच्या मंचावरून भाजप मतदारांना आवाहन करताना दिसून येत आहात. भाजप कार्यकर्ता आणि मतदार म्हणून मी आपल्या आवाहनाचा स्वीकार आणि आदर करतो परंतु गेल्या २० वर्षांत आपल्या मतदारसंघात जे काही घडले आहे त्याचा मी जिवंत साक्षीदार आहे. आम्ही गावात, खेड्यात, रस्त्यावर उतरून, लोकांच्या घरात जाऊन भाजप वाढवण्यात खारीचा वाटा उचलला आहे. गेली २० वर्षे बाळ माने आमच्यासोबत सबंध तालुक्यात फिरत होते, वडीवस्तीवर पोचत होते हे आपणास पण ज्ञात असेल. २००४ साली पराभव होऊन देखील खचून न जाता पुन्हा २००९ साली कडवी झुंज आपण दिली त्यावेळी कदाचित नशीबाची साथ नव्हती. २०१४ लोकसभा निवडणुकीत युती उमेदवार निवडून आणण्यात आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यात बाळ माने यांचा सिंहाचा वाटा होता; परंतु २०१४ साली पुन्हा एकदा संपूर्ण विजयाची तयारी असताना युती तुटली आणि तरीही पराभव दिसत असून देखील मागे न हटता आपले बाळ माने हिमतीने लढले आणि आपण सर्वांनी भाजप मतदारांनी त्यांना मतदान केले. २०१९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती झाली आणि बाळ माने यांनी खासदार निवडून आणण्यात मोठी जबाबदारी पार पाडली. २०१९ विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत ह्यांचे काम देखील पक्षाची जबाबदारी म्हणून बाळ माने नी केले. परंतु निकालानंतर घात झाला आणि मतदान करून देखील २.५ वर्षे भाजप सत्तेबाहेर राहिला आणि आम्ही कार्यकर्ते आणि मतदार उपेक्षित राहिलो, अवहेलना सहन करत राहिलो.
तळागाळात काम करताना एक भाजप कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्षे आम्ही भयंकर अन्याय आणि त्रास सहन केलाय. परंतु प्रत्येक वेळी काहीही घडले तरी नेता म्हणून बाळ माने आमच्या सोबत हजर होते, आम्हाला साथ देत होते. सुजयसारख्या आपल्या हाडाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तेव्हा बाळ मानेच मदतीला आले आणि तुरुंगात देखील गेले.
आपण मोठी नेतेमंडळी आहात. आपण आज ह्या गोष्टी विसरला असाल पण गेली २५ वर्षे भाजप कार्यकर्ता म्हणून बाळ मानेंनी आमची साथ कधी सोडली नाही. हो आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्या प्रचारात स्वताला वाहून घेतले आहे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आजवर फक्त त्रासच दिलाय आणि ह्या पुढे ही त्रास देणार आहेतच. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ह्यांचे रंग लवकरच दिसतील ह्याची तुम्हाला खात्री नसली, तरी आम्हाला खात्री आहे. परुळेकर साहेब आणि पटवर्धनसाहेब आम्ही लहान कार्यकर्ते असलो तरी त्रास मोठा आम्हालाच सहन करावा लागला आहे आजपर्यंत.
बाळा माने ना गद्दार ठरवून, विचारधारेच्या विरोधात गेले असे बोलून तुम्ही ज्यांचा हात धरताय त्यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत नक्की काय खेळ केले हे त्यांना एकदा त्यांच्याच मंचावरून विचारण्याचे धाडस दाखवा. गद्दार आणि सतत बदलणारी विचारधारा काय असते ते एकदा शेजारी खुर्चीत बसता तेव्हा विचारा सामंताना. एक ध्यानात ठेवा आज बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी देखील गद्दारी गाडायचे मनावर घेतले आहे आणि आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी देखील आमच्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचे ठरवले आहे.
कितीही आवाहन आणि भाषणे करा पण आमचं ठरलंय
-एक सामान्य भाजप कार्यकर्ता



