गुहागर विधानसभा आणि भास्करराव

– अभिजीत हेगशेट्ये
रघुनाथराव पेशव्यांनी गारद्यांना लिहिलेल्या पत्रात “ध” चा “मा” केला आणि इतिहासाचे पान बदलले. पेशवाईचा इतिहास बदलला असा दीर्घ राजकीय इतिहास असणाऱ्या आनंदीबाई (पेशवा) भट यांचे माहेर गुहागरचे ओक यांच्याकडील. एक प्रदीर्घ पेशवेकालीन वारसा लाभलेला गुहागर परिसर समुद्र किनाऱ्यावरील अत्यंत निसर्गरम्य स्थळ. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असणारा मतदारसंघ. याची उभारणी आणि इतिहास डॉ. तात्या नातू यांच्या मेहनत, त्याग आणि श्रमातून साकारलेला. १९६०-७० चा काळ डॉ. तात्या नातू हे रामपूर, पाथर्डी, गुढे, पालशेत, गुहागर परिसरातील एकमेव डॉक्टर होते. आपल्या मेडिकल बॅगसह सायकलवरून ते संपूर्ण परिसर फिरत आणि गावागावात जाऊन वैद्यकीय सेवा देत होते. गरीब रुग्णांकडून पैसेही घेत नसत. गरिबांचा देवदूत, मसिहा अशीच या परिसरात डॉ. तात्या नातू यांची ओळख होती. येथील सर्वसामान्यांसाठी ते त्यांचे दैवत होते; मात्र डॉ. तात्या यांनी आपली साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी कधी सोडली नाही. जनतेच्या या प्रेमातूनच एक दिवस ते या विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या जाण्यानंतर तो वारसा डॉ. विनय नातू यांच्याकडे आला.
२००४ च्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर भास्कर जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर संधी दिली. या संधीचा फायदा घेत भास्कर जाधव यांनी जनसंघ भाजपची पारंपरिक सत्ता असणाऱ्या गुहागर मतदारसंघात नव्याने राजकीय बांधणी केली आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते त्या मतदारसंघातून बहुमताने निवडून येत त्यांनी राजकीय धुरंधरांना चकीत केले. आज गुहागर मतदारसंघ हा भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील वाडीवस्ती ते शिक्षण आदी प्रत्येक क्षेत्रात त्यांचा संपर्क आहे आणि तेथील कामांचा पाठपुरावा करण्यात आणि जनतेला आपलेसे करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. १९९५ पासून विधीमंडळ सदस्य (आमदार) असणारे भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची संधी फार अल्प मिळाली; मात्र तरीही आपल्या नेतृत्व गुणावर त्यांनी आपला मतदारसंघ राखून ठेवला आहे. २०२४ च्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात अटीतटीच्या निवडणुका आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आपआपल्या मतदारसंघात प्रचारात अडकले आहेत आणि भास्कर जाधव मात्र स्वतःच्या मतदारसंघात मतदारच प्रचार करून आपला विजय करतील या विश्वासाने संपूर्ण जिल्हा आणि राज्यात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
अमोघ आणि प्रभावी वक्तृत्व हा भास्कर जाधव यांचे राजकीय क्षेत्रातील प्रभावी आयुध आहे. एक काळ होता ज्यावेळी बॅ. नाथ पै त्यांनतर प्रा. मधु दंडवते यांच्या भाषणासाठी लोक तासनतास ताटकळ रहायचे. कुसुमताई अभ्यंकर, आठल्ये गुरुजी, निशिकांत जोशी ही आमदार मंडळीही अभयासपूर्ण आणि प्रभावी मांडणी करत. त्यांच्या त्यांच्या वक्तृत्वाची एक विशिष्ठ शैली होती ती जनतेला आवडत असे; मात्र आजच्या राजकीय नेतृत्वात ती क्षमता दिसत नाही. शब्दसंचय कमी पडतो, तर कधी आकलनातच गोलमाल होते आणि अशा वेळी माईकपेक्षा मोठ्या आवाजात ओरडत आपण काय काय केले हे सांगत नेते पुढे पुढे जात राहतात. मागून कार्यकर्ते पाकीट सांभळत राहतात. यात भास्कर जाधव यांचे वक्तृत्व हे अत्यंत प्रभावी आहे. विधीमंडळाने त्यांना अत्युत्तम वक्ता म्हणून गौरविले आहे. भाषणातील आरोह, अवरोह, चढ-उतार, विशिष्ठ शब्दांवरील जोर, त्यातही मिश्किल मिमिक्री, काही चपखल उदाहरणे, श्लोक याचा वापर करत आपला मुद्दा खुलवित नेत श्रोत्याला आपल्या शब्दसमार्थ्यांने मंत्रमुग्ध करणे हा भास्कररावांचा विशेष गुण आहे. शिवसेना आणि महायुतीकडे भास्करराव हा अत्यंत आक्रमक प्रभावी प्रचाराचा हुकमाचा एक्का आहे. या नेत्याच्या या शैलीची आणि नेतृत्वाची तुलना अन्य कोणाशी करणे हे अन्यायकारक असेल.
आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत मुत्सद्दी आणि राजकीय पटलावरील वेगाने वरच्या पायरीवर झेपावणारे यशस्वी नेतृत्व म्हणून जिल्हा पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा प्राधान्याने विचार होतो. सत्ता हाती असणे आणि सत्तेच्या पारड्यात असणे हा त्यांचा मुत्सद्दीपणाचा गुणविशेष मानला जातो. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्तेच्या चाव्या मागील सात वर्षे त्यांच्या हाती आहेत; मात्र तरीही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ वगळता इतरत्र थेट विधानसभा निवडणूक लढण्याचे धाडस ते करू शकणार नाहीत.
त्याचवेळी भास्कर जाधव यांचे राजकीय नेतृत्व म्हणून चर्चा करताना रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघावर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघात ते १९९५ आणि २००० साली निवडून आले आणि आजही या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे. येथे कोणाला निवडून आणायचे आणि पाडायचे याचा कार्यक्रम ते अचूक करू शकतात. गुहागर मतदारसंघ तर त्यांनी त्यांचा स्वतःचा बालेकिल्लाच केला आहे. त्याला कित्येक आक्रमणे आले, तरी तसूभरही डगमगणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ हा ही त्यांनी गुहागरसोबत बांधणी करत तेथे राष्ट्रवादीचे संजय कदम यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यावेळी त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आपला करिश्मा पेरला आहे. त्यांचे साडू भाजपचे बाळ माने यांना ठाकरे शिवसेनेत आणत त्यांना थेट उदय सामंत यांच्या विरोधात उभे करत काटे की टक्कर उभारली आहे. सामना मोठा अटीतटीचा केल्याने ना. सामंत यांना त्यांच्या सहज सोप्या वाटणाऱ्या रत्नागिरी मतदारसंघात अडकून बसावे लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव यांना प्रत्येक मतदासंघातून सभांची मागणी आहे. लोक भास्कर जाधव यांच्या सभेसाठी तासनतास ताटकळत राहतात असे चित्र आहे. भास्कररावही आपल्या ओघवत्या आणि प्रसंगी आक्रमक होत जाणाऱ्या शैलीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गद्दारीची, फसवणुकीची, पाठीत खंजीर खूपसल्याच्या कथांची भावनोत्कट, रसभरीत वर्णन करत गरुडाच्या कथांची उपमा देत मतदारांना मंत्रमुग्ध करून टाकतात. संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वक्ता म्हणून मागणी असणारा भास्करराव हे एकमेव कोकणचे नेतृत्व आहे. त्यांच्या या प्रखर प्रहाराचा प्रभाव कोकणच्या पाच विधानसभांचे भवितव्य चितारणारा असेल असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे.


