क्रीडामुख्य बातमी

राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा डेरवण येथे जल्लोषात 

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय मैदानी (१४, १७, १९ वर्षांखालील मुली) स्पर्धेचे आयोजन डेरवण (ता. चिपळूण) एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल येथे नुकतेच करण्यात आले होते.

या स्पर्धेत राज्यातून नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, छ. संभाजी नगर, अमरावती, नाशिक, क्क्रीडा डा प्रबोधिनी, कोल्हापूर अशा एकूण ९ विभागांतील ३६ जिल्ह्यांतून अंदाजे १ हजार ७१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी असल्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन या स्पर्धेत प्रेक्षकांना अनुभवता आले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे (पुणे) उपसंचालक संजय सबनीस, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, तसेच क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, गणेश जगताप, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, गणेश खैरमोडे, क.लिपिक प्रणित कांबळे व स्पर्धेसाठी उपस्थित निवड समितीमध्ये गणेश जाधव, पूनम नवगिरे, बळवंत बाबर, सिमा पाटील, अविनाश पाटील, पारस पाटील, कय्युम शेख, हर्षल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले. श्री. सबनीस यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा फायदा घेऊन सतत आपली कामगिरी उंचावण्याबाबत संबोधित केले. तसेच श्री. पाटील यांनी खेळ आणि त्या संबंधित शासकीय प्रोत्साहनपर योजना याबाबतचे महत्त्व स्पष्ट करून खेळाडूंना संबोधित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. खैरमोडे यांनी केले.

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक इव्हेंटमधील प्रविण्यप्राप्त पहिल्या दोन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकचा फायदा आमच्या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यास कारणीभूत ठरल्याचेही मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलामध्येच खेळाडूंची उत्तम निवास भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत आम्ही निर्धास्त होतो, असेही पालकांनी आवर्जून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button