आज दिनांक(सदर)राजकीय

उद्योग महोत्सवाचे फलित?

VACCINE

नारायण राणे यांनी नुकतेच रत्नागिरी येथे दोन दिवसांच्या उद्योग महोत्सवाचे अतिभव्य स्वरूपात आयोजन केले होते. केंद्रीय सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग मंत्री या केंद्रातील ज्येष्ठ मंत्रीपदावर असताना स्वतःच्या खासदारकीच्या अंतिम क्षणी राणे यांना अचानक रत्नागिरीत असा उद्योग महोत्सव घेण्याचे का सुचावे? याचे आश्चर्य वाटत होते. ह्या मेळाव्याचे आयोजन भपकेबाज आणि प्रचंड खर्चाचे होते, असे एकूणच शमियानाचा दर्जा पहात जाणवत होते; मात्र या मेळाव्याकडे फारसे कोणी फिरकले नाही आणि स्थानिकांचे चेहरे उद्घाटन ते समारोप कुठेच दिसले नाहीत.
नारायण राणे म्हणजे कोकणचे अनभिषिक्त सम्राट. गेली २८ ते ३० वर्षे ते कोकण प्रांताच्या राजकीय क्षेत्रातील अत्यंत मातब्बर व्यक्तिमत्त्व. बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील एक शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता ते भाजप सरकारात केंद्रीय उद्योग मंत्री अशा सत्तेच्या वरच्या श्रेणीवर चढत्या भाजणीप्रमाणे त्यांचा विलक्षण आणि चमकदार राजकीय प्रवास. या प्रवासात “सत्तेचा सहवास” यामुळे धोरणापासून ते कधीच वंचित झाले नाहीत. त्यामुळेच शिवसेना, कॉँग्रेसस ते भाजप या देशातील सर्व मुख्य राजकीय पक्षांच्या मांडवातून ते सतत वरिष्ठ मंत्रीपदाचे आणि सत्तेचे मानकरी झाले. या वाटचालीत त्यांनी आपल्या कुटुंबाचीही यथोचित काळजी घेतली. नीलेश खासदार झाला, तर नीतेशला आमदार म्हणून निवडून आणले. कोकणचा विकास आणि राणे कुटुंबीय हे नाते एक शब्दच होऊन बसले. विरोधी पक्षांनी त्यांच्यावर नको नको ते आरोप केले; मात्र कोकण विकासाचे नाते राणे यांनी गेल्या ३० वर्षांत तसूभरही तुटू दिले नाही, हेच त्यांच्या प्रदीर्घ काळातील कोकण विकासाच्या राजकारणाचे गमक आहे.
कोकणच्या विकासासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ज्यांना या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि विविध महत्त्वाच्या संधी मिळतच राहिल्या ते कोकणचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आज म्हणत आहेत, की कोकणात विपुल प्रमाणात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत, हे त्यांचे विधान संभ्रमित करणारे वाटते. हे प्रयत्न कोणी करणे त्यांना अपेक्षित होते, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला तो म्हणजे कोकणात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी कोकणी माणसाने आपल्या वृत्तीत बदल करायला हवा. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये लोक आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून मदत मिळावी म्हणून आपल्याला भेटतात; परंतु कोकणातील कोणी भेटत नाही, हे विधानही गोंधळात टाकणारे आहे. मुळात केंद्र सरकारने राणे यांना कोकणातील भाजपचा जनाधिकार वाढविण्यासाठी खास लघु, मध्यम उद्योग खाते दिले. या काळात कोकणात किती लघु, मध्यम उद्योग सुरू केले गेले? आपण मंत्री असताना असे विधान करावे? कोकणातील लोक यासाठी आपल्याला भेटण्यास येत नसतील याची कारणे वेगवेळी असू शकतील. उद्योगापेक्षा टॅक्स मोठा अशी भीतीही काहीजणांना असावी. लोक नाही आले असे गृहीत धरले, तर जनतेच्या नेत्याला जनतेपर्यंत का नाही जाता आले? हा प्रश्न आहेच की.
तिसरा मुद्दा आंबा, काजू, जांभूळ यातून उत्पन्नाचे मोठे स्त्रोत निर्माण होऊ शकतात; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा उद्योगांचे क्लस्टर करण्याचा प्रस्ताव आला, तर आपण त्याला सहकार्य करू. नवीन उद्योग आले, तर प्रशिक्षण देण्याची तयारी आहे; मात्र त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही, हे विधानही फारच वरवरचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा क्लस्टरचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग झाला; मात्र त्याचे लालफीत आणि भ्रष्ट यंत्रणेत पार कंबरडे मोडण्यात आले.
नारायण राणे यांनी हा उपक्रम आणि विधाने आपल्या मंत्रीपदाच्या अखेरच्या टप्प्यात का करावीत? हा प्रश्न आहे. गेल्या २-३ वर्षांत त्यांना या उपक्रमाची व आपल्या असणाऱ्या मंत्रीपदाच्या अंमलबजावणीची जाणीव का होऊ नये? नारायण राणे यांनी मागील निवडणुकीत घेतलेल्या सभांमध्ये भाषण करताना कोकणच्या विकासासाठी फक्त नारायण राणे यांना मत द्या. कोकण विकास काय आणि कसा करायचा हे माझ्यावर सोपवा, असे सांगितले होते. त्यावेळी ते कोकणच्या दरडोई उत्पन्नावरही बोलले होते. कोकणवासीयांनीही त्यांना तशीच भरभरून मते दिली. त्यांना निवडून देतानाच त्यांच्या मुलाला खासदार, आमदार केले. नारायण राणे यांच्या काळात चिपी विमानतळ प्रकल्प, मालवणजवळील अंडर वॅाटर प्रकल्प कोट्यवधींच्या चर्चा झाल्या; मात्र नाव घेण्यासारखे कोणतेच प्रकल्प दाखवता येत नाहीत. मात्र कोकणात वैशिष्ट्यपूर्ण भाषा संस्कृती आणि राडा संस्कृतीचे पायोनियर होण्याचा मान त्यांना आहे.
कोकणातील सर्वाधिक शक्तिमान राजकीय नेतृत्त्व अशी राणे यांची प्रतिमा आहे आणि गेल्या ३० वर्षांत त्यांना ती संधीही मिळाली. कोकणचा बॅकलॅाग भरण्यासाठी तर ही सर्वाधिक मोठी संधी मानता येईल. विकास झाला अगदी डोळे दिपून जातील, असा झाला; मात्र तो काही व्यक्तींपुरताच मर्यादित झाला. कोकण आणि येथील सर्वसामान्य माणूस विकासापासून दूर झाला. कोकणच्या तरुणाला आपली फसवणूक होत असल्याची जाणीव होत आहे. येथे भांडत राहून आणि नेत्यांच्या मागून फिरण्यात आयुष्य खर्च करण्यापेक्षा बाहेरची वाट धरलेली बरी या मानसिकतेत तो आहे. यामुळेच गेल्या ५-१० वर्षांत युवक युवतींचे कोकणातून स्थलांतर होण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे असे आहेत ज्यांची लोकसंख्या घटत आहे.
नारायण राणे यांनी रत्नागिरीत उद्योग मेळावा घेतला त्यावेळी त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदतही संपली होती आणि आचारसंहिता लागत असल्याने उद्योग मंत्रीपदाचा कालावधीही अंतिम टप्प्यात आहे. हाच मेळावा त्यांनी किमान वर्षभरापूर्वी घेतला असता, तर रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांना त्याचा नक्कीच फायदा झाला असता. लाखो की कोटी माहिती नाही खर्चाच्या उद्योग मेळाव्याला येथील बेरोजगार तरुण अधिक लाभार्थी येऊ शकले असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button