कोकणात शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात सामना रंगणार
आज जिल्हाभरात उमेदवारी अर्ज दाखल होणार

रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली-खेड-मंडणगड, लांजा-राजापूर या तीन ठिकाणी शिवसेनेचा शिंदे गट विविध ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. आजपासून (२४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राजापूरचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी हेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसला जागा न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे दापोलीचे आमदार योगेश कदम तसेच दापोली विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कुडाळ, मालवण व सावंतवाडी मतदारसंघात शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असाच सामना रंगणार आहे आहे. कुडाळ-मालवणमधून नीलेश राणे यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक तर सावंतवाडीतून मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली असा सामना होणार आहे.
दरम्यान गेले काही अवघे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे रत्नागिरी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर आता ठाकरे गटात प्रवेश केलेले बाळ माने हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आहे.



