मुख्य बातमीराजकीयलोकसभा २०२४

नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाई या महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी भारताचे गृहमंत्री, भाजपा नेते अमित शहा उद्या (३ मे) रत्नागिरीत जाहीर सभा घेणार आहेत. आज दुपारपासून पोलीस पाहणी करत असून सर्व परिसराची कसून तपासणी केली जात आहे. तसेच सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उद्या दुपारी १२.३० वाजता गोगटे कॉलेजच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार असून या सभेला प्रचंड गर्दी होणार असून, भाजपा महायुतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सभेची जय्यत तयारी झाली आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही हजारो वाहनांतून महायुतीचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सभेची वेळ दुपारची असली तरी पूर्ण मैदानावर मंडप व्यवस्था तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

या सभेला व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम, माजी खासदार निलेश राणे, किरण सामंत, लोकसभा सह प्रभारी तथा माजी आमदार बाळासाहेब माने, ॲड. बाबा परुळेकर, राष्ट्रवादीचे अजित यशवंराव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, दत्ता सामंत यांच्यासमवेत महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. आज सायंकाळी मंडपाची व्यवस्था पाहण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सचिन वहाळकर, उमेश कुळकर्णी, सचिन करमरकर, मंदार खंडकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. सभेसाठी ३२ फुट बाय ५४ फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तब्बल २० हजार खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या स्क्रिनवर सभा पाहता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button